महाविकास आघाडीकडून बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा श्रेयासाठी

Google search engine
Google search engine

भाजपा नगरसेविककांचा आरोप

कुडाळ | प्रतिनिधी : कुडाळ नगरपंचायतीमार्फत तहसील कार्यालयाच्या शेजारी उभारण्यात येणाऱ्या बालोद्यानाच्या कामांमध्ये अनेक त्रुटी असताना श्रेयासाठी महाविकास आघाडी या बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा करीत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते विलास कुडाळकर व नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे या बालोद्यानाच्या कामाची चौकशी करण्यासंदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या निवेदनानुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कामाची चौकशी करण्यासंदर्भात शिफारस केली आहे. असे सांगून या बालोद्यानाचे लोकार्पण हे प्रशासकीय नसून काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केले जात आहे.

कुडाळ नगरपंचायतीमध्ये असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी मार्फत कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपचे गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका सौ. संध्या तेरसे, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, गणेश भोगटे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी सांगितले की, शहरातील विकास कामाला आमचा विरोध नाही. हे विकास काम पूर्वीचे असून ठरावांमध्ये झालेल्या मंजूर कामानुसार हे काम केलेले नाही. त्यामुळे यामध्ये झालेल्या अपहाराची माहिती जनतेपर्यंत जावी जनतेला देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कशाप्रकारे अपहार केला जातो हे समजावे म्हणून या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

श्रेयासाठी बालोद्यानाचे लोकार्पण

या पत्रकार परिषदेमध्ये नगरसेविका सौ संध्या तेरसे यांनी सांगितले की, कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता असताना २०२१ मध्ये तहसील कार्यालया जवळील नगरपंचायतीने नाट्यगृहासाठी घेतलेल्या जागेमधील १० गुंठ्यामध्ये बालोद्यान व्हावे असा ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाचे सूचक म्हणून मी आणि अनुमोदन हे सध्याचे स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांनी दिले होते. या कामाची सुरुवात झाल्यानंतर हे बालोद्यान ४ ते ५ गुंठ्यामध्ये उभारण्यात आले. तसेच या उद्यानामध्ये बसविण्यात आलेली खेळणी ही मोठ्या किंमतीची आहेत त्यातील एक खेळण हे फक्त २७ लाख रुपयांचे आहे. शहरातील जनतेला सुविधा मिळावी म्हणून १० गुंठे मध्ये मंजूर केलेले उद्यान फक्त ५ गुंठ्याच्या आत करण्यात आले आहे. यामध्ये ज्या ज्या गोष्टी अंदाजपत्रक मध्ये आहेत त्या पूर्ण केलेल्या नाहीत. असे असतानाही उद्यान लोकार्पण केले जात आहे. या लोकार्पण सोहळ्या संदर्भात १० एप्रिल रोजी नगरपंचायतीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये नगर अभियंता विशाल होडावडेकर यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समर्पक न देता तसेच त्यांच्याजवळ मागितलेल्या माहितीचे कागदपत्र सुद्धा देण्यात आलेले नाही या कामाला आमचा विरोध नाही पण या कामाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अपहाराला आमचा विरोध आहे. १० गुंठे जमिनीचे उद्यान ज्या उद्यानाच्या विकासासाठी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. ते उद्यान फक्त ५ गुंठ्याच्या आत करण्यात आले आहे. आता या उद्यानाचा लोकार्पण सोहळा हा प्रशासकीय नसून राजकीय केला जात आहे त्यामुळे श्रेयासाठी आणि विकास निधी खर्च केला जात आहे दरम्यान या संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे चौकशीची मागणी केल्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ या कामाची चौकशी करण्यासंदर्भात शिफारस केली आहे. हे काम तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्या मंजुरीने मंजूर करण्यात आले होते असे नगरसेविका सौ संध्या तेरसे यांनी सांगून या बालोद्यानाला विरोध नसून या बालोद्यानाच्या झालेल्या कामाच्या अपहाराला आमचा विरोध आहे असे त्यांनी सांगितले.