आठल्ये – सप्रे – पित्रे महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध कार्यक्रमाव्दारे अभिवादन

Google search engine
Google search engine

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विविध उपक्रमांव्दारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रा. ललिता तांबे यांचे ‘सर्वव्यापी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. प्रा. तांबे यांनी आपल्या व्याख्यानात बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना बाबासाहेबांनी समाज व देशाप्रती दिलेल्या योगदानावर महत्वपूर्ण प्रकाश टाकला. बाबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, संविधानात्मक, अर्थ व कृषी विषयक विचारांबाबत सविस्तर आढावा घेतला.
प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी आपल्या मार्गदर्शनात बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विकास शृंगारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी श्रुतिका चव्हाण हिने केले. या व्याख्यानाला उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

दिनांक १५ एप्रिल रोजी ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सलग १२ तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यानंतर ग्रंथालयातर्फे आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनात डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेली तसेच इतर लेखकांनी बाबासाहेबांवर लिहिलेली सुमारे २५० हून अधिक पुस्तके प्रदर्शित करण्यात आली होती. सकाळी ७:३० ते सायंकाळी ७:३० या वेळेत सलग १२ तास वाचनाव्दारे विचारमंथन घडवून आणलेल्या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, सहाय्यक स्वप्निल कांगणे, रोशन गोरुले, सौरभ जाधव आणि आश्लेषा इंगवले यांचे विशेष सहकार्य लाभले.
फोटो- १. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर.
२. सलग १२ तास वाचन उपक्रमात सहभागी झालेले वाचक.
छाया:- प्रा. धनंजय दळवी.