Vedamurthy Achyut Shankar Joshi of Dhamanse passed away
रत्नागिरी | प्रतिनिधी : वेदमूर्ती अच्युत शंकर जोशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. रत्नागिरी तालुक्यातील धामणसें गावातील ज्येष्ठ नागरिक आणि प्रसिद्ध पुरोहित वेदमूर्ती अच्युत शंकर जोशी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते अच्युत अप्पा या नावाने प्रसिद्ध होते. वेद शास्त्र, धार्मिक कार्य व संस्कार यांचा गाढा अभ्यास होता. वेद मुखोग्द तर होतेच पण आपल्या वागण्यातून त्यांनी वेदांचे आचरण कसे करावे हे दाखवून दिले.
पौरोहित्य शिकणाऱ्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. धामणसें दशक्रोशीत त्यांना मानाचे स्थान होते.
मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी धामणसें गावासह नेवरे, ओरी, निवेंडी, चाफे, कळझोंडी, गडनरळ, चवे देउड, कोळीसरे, वाटद आदी गावातील त्यांचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.अच्युत अप्पा यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे, पुतणे, सूना असा विशाल परिवार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे भूतपूर्व उपाध्यक्ष राजेश मुकादम यांचे ते सासरे होत. तसेच धामणसें गावातील प्रतिष्ठित नागरिक व श्री रत्नेश्र्वर ग्रंथालयाचे सचिव मुकुंद तथा बाळासाहेब जोशी यांचे ते काका होत.
अच्युत अप्पा यांच्या निधनाने दशक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.