On behalf of the Chiplun Taluka Buddhist Welfare Committee on April 30, Dr. Grand celebration of Ambedkar Jayanti
चित्ररथांसह भव्य मिरवणूक निघणार, प्राध्यापक आनंद देवडेकर यांचे प्रमुख मार्गदर्शन.
चिपळूण l प्रतिनिधी : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण (स्थानिक) व मुंबई यांच्या वतीने विश्वभूषण, भारतरत्न, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 जयंती महोत्सव रविवार दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी चिपळूनातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भव्य मिरवणूक चित्ररथांसह निघणार आहे. भव्य चित्ररथ हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या मुंबई मुख्य कमिटीचे अध्यक्ष विठोबादादा पवार तर स्वागताध्यक्ष स्थानिक मुख्य कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत हे भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम सर उपस्थित राहणार आहेत. जयंती महोत्सवाच्या जाहीर अभिवादन सभेस प्रमुख वक्ते म्हणून मासिक सद्धम्मचे संपादक प्राध्यापक आनंद देवडेकर ( मुंबई ) हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास संस्थेचे मुंबई मुख्य कमिटीचे सरचिटणीस हरिश्चंद्र पवार यांची तसेच संस्थेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार आहे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पवार, संदेश पवार, दिवाकर जाधव हे करणार आहेत.
सकाळी साडेनऊ ते दहा वाजता स्मारक भवन येथे धम्म ध्वजारोहण केले जाणार असून समता सैनिक दल चिपळूण यांच्यावतीने मानवंदना दिली जाणार आहे. तदनंतर दहा ते साडेदहा वाजता धम्मगाथा पठणाचा कार्यक्रम बौद्ध उपासकांच्या हस्ते पार पाडण्यात येणार आहे . त्यानंतर संस्थेच्या आठही विभागातून चित्ररथांसह भव्य मिरवणूक चिपळूणतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे येणार आहेत.या स्मारक भावनापासून चिपळूण एसटी स्टँड चिंचनाका मार्गे चिपळूण कराड रोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळ्याला अभिवादन व तेथून मुंबई गोवा महामार्गे पुन्हा स्मारक भवन येथे चित्ररथांसह मिरवणूक तसेच बाईक रॅली निघणार आहे. यामध्ये समता सैनिक दलाच्या जवानांचाही समावेश असणार आहे. काही जिवंत देखावे तसेच कलाविष्कार सादर केले जाणार आहेत.
दुपारी बारा ते दोन या वेळेत जाहीर अभिवादन सभा होणार असून त्यात प्राध्यापक आनंद देवडेकर सर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी दोन वाजता भोजनदान आणि तदनंतर दुपारी साडेतीन वाजता समारोप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने सरचिटणीस हरिश्चंद्र पवार व सुहास पवार यांनी केले आहे.