Traffic police should be appointed in Pag Powerhouse area: Feroze Zare
महामार्ग चौपदरीकरण कामामुळे नागरिकांचा जीव टांगणीला
चिपळूण l प्रतिनिधी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामामुळे सध्या शहरातील पाग पॉवरहाऊस परिसरातील वाहतूक धोकादायक बनली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी आणि भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरात वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फिरोज झारे यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्याकडे केली आहे.
शहरातील पाग परिसरात महामार्ग चौपदरीकरण कामाला जोरदार सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ठेकेदार कंपनीने रस्त्यावरचे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील काही छोट्या व्यावसायिकांनी पुन्हा त्याच परिसरात आजुबाजूला बस्तान बांधले आहे. शेजारीच पुलाचे काम सुरू आहे. महामार्गासह येथे पुलाचे काम सुरू आहे. शिवाय येथे मोठा चौक आहे. त्यामुळे या परिसरात महामार्गावरील अवजड वाहनांसह लहान वाहने, अंतर्गत रस्त्यावरील दुचाकी, वाहने, एस.टी बसेस, स्कूल बस, कामगारांच्या बसेस सतत धावत असतात. मात्र येथे वाहतुकीचे नियमन होत नसल्याने कोणते वाहन, कोणत्या दिशेने येते, कुठे वळते काहीच कळत नसल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येमुळे नागरिकांसह वाहनधारकांचा जीवही टांगणीला लागला आहे. त्यामुळे पाग पॉवरहाऊस परिसरात वाहतूक पोलीस तैनात करावा, अशी मागणी श्री. फिरोज झारे यांनी केली आहे.