रानमित्र टुरीझम आचरा तर्फे पक्षीगणना सुरू
या गणनेत एकूण ९८प्रजातींच्या ७४८पक्षांची नोंद करण्यात
आचरा–अर्जुन बापर्डेकर,
पक्षीसप्ताहाचे औचित्य साधून, रानमित्र टुरिझम आचरा तर्फे आयोजित करण्यात आलेला, मालवण शहरातील पक्षीगणनेचा कार्यक्रम, शनिवार दिनांक ५नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. या पक्षीगणनेत मालवण मधील सागरी महामार्ग परिसर ( आचरा रोड ), आडवण परिसर आणि गणेश मंदिर ते रॉक गार्डन या परिसरात पक्षीगणना करण्यात आली. या गणनेत एकूण ९८प्रजातींच्या ७४८ पक्षांची नोंद करण्यात आली.
लहान शिंजिर, छोटा गोमेट, चिमणी, मैना, टोई पोपट, ठिपकेवाली नाचण, बलाकचोच खंड्या, हिरवी ढोकरी, स्वर्गीय नर्तक या स्थानिक प्रजातीसोबतच तपकिरी डोक्याचा कुरव, पल्लासचा कुरव, छोटा कंठेरी चिखल्या, सामान्य तुतारी, सामान्य गप्पीदास आणि युरोपियन निलपंख यांसारखे स्थलांतरित पक्षीही आढळून आले.
या पक्षीगणनेसाठी रानमित्र टुरिझम आचराचे शिल्पन गावकर, डॉ. श्रीकृष्ण मगदूम, स्वप्नील गोसावी, ऍलिस्टर फर्नांडिस, सुशांत सावंत, सिद्धेश देवधर आणि तेजस सामंत उपस्थित होते. त्या बरोबरच मालवण वायरी येथील दर्शन वेंगुर्लेकर आणि खानविलकर तर मालवण येथील चंद्रवदन कुडाळकर व स्वाती पारकर उपस्थित होते. याप्रसंगी कोल्हापूरहुन श्री व सौ. मिलिंद गडकरी हे पक्षीप्रेमीही उपस्थित राहिले होते.