वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘सप्तक २०२३’ वार्षिकोत्सव उत्साहात साजरा

Google search engine
Google search engine

सात दिवसीय कालावधीत विविध तेरा खेळांची व सांस्कृतिक कार्यक्रमाची विद्यार्थांना मिळाली मेजवानी
गुहागर प्रतिनिधी

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव ‘सप्तक २०२३’ नुकताच दिमाखात साजरा झाला. महाविद्यालयाच्या सात दिवस चाललेल्या या वार्षिकोत्सव मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, विविध डेज यासारख्या विविध स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले.

यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना सादर करण्याची संधी लाभली. नृत्य, गायन, अभिनय, क्रीडा स्पर्धातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणही होते. महाविद्यालयात याच महोत्सवांच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकाससुद्धा होत असून शिस्त, कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन याची पुरेपूर माहिती विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळण्यासाठी महाविद्यालयाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यावर्षी ही या वार्षिकोत्सवाचे संपूर्ण आयोजन व नियोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदने केले. यामध्ये मिस व मिस्टर एमपीसीओई हा किताब यावर्षी अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी विभागातील कु.भक्ती पवार व विद्युत अभियांत्रिकी विभागाचा कु. शोहेब तदवाई यांना मिळाला.

त्याचप्रमाणे क्रीडा व सांस्कृतिक प्रकारामध्ये मुले व मुलींमधून स्वतंत्ररित्या जास्तीच जास्त पदकांची लयलूट करणाऱ्या विभागास फिरते चषक देण्यात येते. या फिरत्या चषकाचा मान यंदा मुलांमधून विद्युत अभियांत्रिकी विभागास मिळाला. तर मुलींमधून स्थापत्य अभियांत्रिकी विभागास देण्यात आले. त्याचप्रमाणे विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह आणि इतर विविध बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या एकूण तेरा खेळांचा समावेश होता. कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ, मुलींच्या क्रिकेट स्पर्धा, गायन, रांगोळी, स्केचिंग व स्नेहसंमेलन या विविध कार्यक्रमांनी हा वार्षिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर वार्षिकोत्सव कार्यक्रम विद्या प्रसारक मंडळ ठाणेचे चेअरमन डॉ.विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा.योगेश काटदरे, क्रीडा विभागाचे समन्वयक प्रा.औदुंबर पाटकर, विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सागर जड्यार, सेक्रेटरी रोहित पंडम व इतर सहकारी आणि सर्व विभागप्रमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.