जुनी सावंतवाडी नव्या पिढीसमोर ठेवण्याचा संकल्प
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कार्यक्रम घेण्याचे नियोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
ऐतिहासिक सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी शहराच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या वतीने केशवसुत कट्ट्यावर लवकरच ‘व्यक्त व्हा, आठवणी जागवा ‘ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सावंतवाडी येथील केशवसुत कट्टयावर हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी दिली.
कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की सर्वप्रथम महाराष्ट्रात अग्र क्रमांकाने नाव घेतले जाते ते संस्थानकालीन सावंतवाडी शहराचे. हे शहर लाकडी खेळण्यांसाठी जग प्रसिद्ध आहे. अशा या सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी शहराची जुनी ओळख आगळी वेगळी होती .या जुन्या सावंतवाडी बद्दल व्यक्त व्हायला, आठवणी जागवल्या जाव्यात म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने घेण्यात येणार आहे. यावेळी शहरातील जुन्या जाणत्या व्यक्तींनी अनुभवलेले सावंतवाडी शहराविषयीच्या आठवणी आपल्या शब्दात जागवायच्या आहेत.
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची बैठक सावंतवाडी येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील कक्षात घेण्यात आली. या बैठकीत जुन्या सावंतवाडी शहरातील आठवणीनी व्यक्त व्हायचं, असा उपक्रम घेण्याबाबत नियोजन करण्यात आले. या बैठकीत उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, ज्येष्ठ सदस्य अँड नकुल पार्सेकर, सदस्य कवी दीपक पटेकर , प्रा.सुभाष गोवेकर आदी उपस्थित होते. व्यक्त व्हा, आठवणी जागवा सावंतवाडी माजी
नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी याबाबत काही टिप्स दिल्या. त्या अनुषंगाने जुन्या सावंतवाडी शहरातील काही आठवणी जुन्या जाणत्या व्यक्तींना माहित आहेत. त्यांनी अनुभवले आहेत त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडी संस्थानच्या, राजवाड्यातील आठवणी, दीडशे वर्षांपूर्वीचे श्रीराम वाचन मंदिर, काकू पडते, जानकी सुतिकाबाई रुग्णालय, एसटी स्टँड, झाप्यांचा जुने नाट्यगृह, विडी कारखाना, जुने थिएटर्स आदी राजकीय, सामाजिक, संगीत, नाट्य अशा विविध क्षेत्रातील जुनी ओळख जुनी आठवण ज्यांनी स्वतः अनुभवले आहेत त्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन आठवणी जागवाव्यात असे स्पष्ट करण्यात आले.
ज्याना आपल्या आठवणी जाग व्हायच्या आहेत त्यांनी आपली नावे सहसचिव राजू तावडे ९४२२५८४४०७ व विनायक गावस तसेच
ॲड. नकुल पार्सेकर यांच्याकडे १५ नोव्हेंबर पर्यंत नोंदवावी.तसेच कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा च्या सदस्यांकडे नावे द्यावीत. सावंतवाडी शहरातील सांस्कृतिक साहित्य चळवळ पुढे नेण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. नवीन युवा साहित्यिक निर्माण करण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवण्यात येत आहेत. व्यक्त व्हा आठवणी जागवा जुन्या सावंतवाडीच्या या उपक्रमातून जुनी सावंतवाडी नव्या पिढीसमोर ठेवण्याचा संकल्प आहे. जास्तीत जास्त सावंतवाडीकारांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Sindhudurg