अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एक गंभीर
खेड | प्रतिनिधी : मुंबई – गोवा महामार्गावर आपेडे फाटा नजीक शिरवली येथून कळंबणी येथे जाण्यासाठी आत मध्ये वळत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार जि प शाळेच्या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला सह प्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
स्वप्निल संजय भटकर (३७, रा. शिरवली ता. खेड जि रत्नागिरी मूळ गांव : मुरंबा , ता. मूर्तिजापूर , जि. अकोला ) असे त्या मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे
तालुक्यातील शिरवली येथून स्वप्निल संजय भटकर हे दुचाकी (एमएच ०८ बीबी १०७३ ) ने कळंबणी येथे जात असता आपेडे फाट्यावर मुंबई च्या दिशेने वळत असताना गोव्याच्या दिशेने जाणार्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार स्वप्निल भटकर हे जागीच मृत्युमुखी पडले तर पाठिमागे बसलेले विनोद वसंत जाधव (४२ ) यांना गंभीर दुखापत झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी एस टी बस च्या शेड मध्ये जाऊन दुचाकी पडली यात भटकर हे जागीच गतप्राण झाले.
या अपघातानंतर जखमींना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र भटकर हे मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. स्वप्निल भटकर हे वडगाव बुद्रुक येथील शाळेवर नियुक्त होते. मात्र सध्या ते कामगिरीवर शिरवली – गुरववाडी या शाळेवर कार्यरत होते. दरम्यान त्यांची मूळ गावी म्हणजे अकोला जिल्हा परिषद येथे बदली झाली होती. मात्र त्यांना सोडण्यात आले नव्हते. त्यांच्या अपघाती निधनाने शिक्षक वर्गाला धक्का बसला आहे.