राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

Google search engine
Google search engine

पद्मश्री गजानन माने यांची उपस्थिती व संस्थेतर्फे भव्य सत्कार

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या २१ व्या पदवीधर तुकडीच्या पदवीदान समारंभासाठी पद्मश्री गजानन माने यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.

संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, ख्यातनाम पर्यावरण तज्ञ डॉ. नितीन पंडित तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे प्रमुख आदी मान्यवरांच्या व्यासपीठावरील उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. बहुसंख्य स्नातक, पालक व प्राध्यापक याप्रसंगी उपस्थित होते.

प्रथम दीपप्रज्वलन झाल्यानंतर राष्ट्रगीत गायन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मुंबई विद्यापीठाचे गीतगान ऐकविण्यात आले व समारंभाला सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी यांनी प्रास्ताविक केले व अंतिम वर्षाच्या निकालांचे सखोल विश्लेषण सादर केले. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी पदवीधारक विद्यार्थ्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कोणतेही काम स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन करावे असे सांगून माजी विद्यार्थी या नात्याने समाजाबरोबरच त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्याही विकासासाठी योगदान द्यावे अशी इच्छा प्रगट केली.

पर्यावरणतज्ञ डॉ. नितीन पंडित यांनी उपस्थित स्नातकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पदवी संपादनातून विद्यार्थ्यांना यापुढे काय व कसे शिकले पाहिजे याचे खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होत असते तसेच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता जागृत होऊन समस्यांना सामोरे जाण्यासाठी विविध मार्ग यातून सापडतात.

यानंतर प्रमुख अतिथी व आंबव गावचे सुपुत्र पद्मश्री गजानन माने यांच्या कार्याची उपस्थितांना माहिती देण्यात आली तसेच महाविद्यालयाने तयार केलेल्या विशेष चित्रफितिच्या माध्यमातून माने यांच्या नौदलातील सेवेपासून ते आजतागायत केलेल्या समाजसेवेचा जीवनपट दाखविण्यात आला. माने १९६५ मध्ये नौदलामध्ये दाखल झाले आणि त्यांनी १२ वर्षे देशसेवा केली. १९६५ च्या भारत पाक युध्दातही त्यांनी सहभाग घेतला होता. सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डोंबिवली येथिल कचोरे गावी कुष्ठरोग वसाहतीमध्ये रुग्णांची सेवा केली. कुष्ठरोग्यांच्या कुटुंबियांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी रोजगार निर्मितीचे त्यांचे काम गेली तीस वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन भारत सरकारने नुकतेच माने यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून संस्थेतर्फे त्यांचा संस्थाध्यक्ष रविंद्र माने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात गजानन माने म्हणाले कि मी कोणतेही काम सेवा म्हणून न करता कर्तव्य म्हणून केले. वयाच्या ६५ व्या वर्षी कुष्ठरोग निर्मुलन जागृतीसाठी डोबीवली ते आंबव ४०० किमी पदयात्रा काढली, ६३ व्या वर्षी जॅपनीज भाषा शिकलो, सैन्यामध्ये भरतीसाठी प्रयत्न करणा-या मुलांसाठी उपक्रम घेतले, जनतेच्या मनामध्ये देशप्रेम वाढावे यासाठी उपक्रम घेतल्याचेहि त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्याना आयुष्यात नेहमी प्रामाणिकपणा, सभ्यता व वक्तशीरपणा जपण्याचा मोलाचा सल्ला दिला.

संस्थेचे अध्यक्ष मा. रवींद्र माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा संदेश दिला. इजिनिअरिंग हि काळाची गरज असून विद्यार्थ्यानी परीश्रमाने पुढील आयुष्यात वाटचाल करावी अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.

यानंतर उपस्थित सर्व स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीक्षा विभागातील सर्व कर्मचा-यानी परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या सर्व विभागप्रमुखांनी यानंतर विद्यार्थ्यांची विभागवार सभा घेऊन हितगुज केले. रोजगारप्राप्त व उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले अनुभव कथन केले. स्नेह्भोजानानंतर समारभाची सांगता झाली.