नियमांचे उल्लंघन झाल्यास यंत्रणांना सक्त कारवाईचे आदेश : जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी- जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्व वाळू/रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांमधून संबंधित वाहन चालकांनी उद्या दि.२१ एप्रिल २०२३ पासून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच वाळू/रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक करावी, असे निर्देश देतानाच नियमांचे उल्लंघन झाल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संबंधित यंत्रणांना आज दिले.
जिल्हयातील वाळू/रेती व अन्य गौण खनिजाच्या वाहतुकीवेळी झालेल्या अपघातांमुळे काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असल्याच्या दुःखदायक घटना विचारात घेऊन यावर उपाययोजना करणे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीची आज बैठक झाली. बैठकीस जिल्हास्तरीय समिती सदस्य म्हणून पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सदस्य सचिव जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदीसह उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी व कणकवली हे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये प्रामुख्याने बेजबाबदारपणे, अतिजलदगतीने, मद्यप्राशन करुन, अनियंत्रितपणे वाळू/रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांवर व वाहन चालकांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या. वाळू/रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत वाहतूक करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.