यावर्षी दरवाढीने ‘मिरची’ झोंबली ; मिरचीच्या वाढत्या भावाने गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले

 

पाटपन्हाळे | वार्ताहर : मिरचीचा भाव वाढल्याने वर्षभर पुरेल इतका मसाला करण्याची सवय असलेल्या गृहिणींना यावर्षीचा मसाला चांगलाच झोंबला आहे. मिरचीचे भाव गगनाला भिडल्याने मसाला करण्यासाठी करावयाच्या आर्थिक बजेटचे गणित जुळवताना महिलांना चांगलीच दमछाक करावी लागली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध मिरचीचे भाव किलोमागे २५० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत झाल्याने मसाल्यासाठी लागणारी लाल मिरची तिखट झाल्याची प्रतिक्रिया गृहिणीकडून व्यक्त केली आहे.

खवय्यांना चटकदार खाण्यासाठी जेवणात लागणारी मसाल्यासाठीची लाल मिरचीचे २० पेक्षा अधिक प्रकार ग्राहकांना पाहायला मिळतात. चवीसाठी लागणाऱ्या बेडगी मिरचीला ग्राहकांकडून मागणी असते. यावेळी मसाल्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचे भाव २५० रुपयांपासून ७०० रुपये किलोपर्यंत असल्याने यावर्षी मसालाही कमी प्रमाणात करण्यात आल्याचे गृहिणीमधून बोलले जात आहे. लाल मिरची विकत घेऊन मसाला केल्यानंतर हा मसाला गृहिणी वर्षभर पुरवितात लग्न सराईत घरचा मसाला असेल तर जेवणाला वेगळी चव असते. घरात बनविलेल्या मसाल्यामुळे खर्च कमी होत असला तरी यावेळी मात्र मिरचीचे भाव वाढल्याने खर्च ही वाढल्याचे महिलांचे म्हणणे आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असून मसाल्यासाठी मिरचीला अधिक मागणी असल्याने मिरचीचे भाव वाढले आहेत. बाजारात विविध कंपन्यांचे मसाले उपलब्ध असले तरी घरच्या मसाल्याला वेगळी चव असल्याने गृहिणींचा मेहनत घेऊन मसाला करण्याकडे अधिक कल असतो.