शिक्षकांच्या नावासमोर लागणार आता ‘टी आर ‘ पदवी : आ. ज्ञानेश्वर म्हात्रे

Google search engine
Google search engine

वाढीव अनुदान टप्पा वाटपाबाबत पटसंख्येची अट कमी करणार

सावंतवाडी । प्रतिनिधी : डॉक्टर, वकील इंजिनियर आदींच्या नावाच्या बोर्डासमोर त्यांच्या पदव्यांचा उल्लेख केला जातो त्या प्रमाणे आता शिक्षकांच्या नावासमोर टी आर ही पदवी लावली जाणार आहे. तशी घोषणा लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. वाढीव अनुदान टप्पा वाटपाबाबत पटसंख्येची अट कमी करण्यात येणार आहे तसा निर्णयही झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, शिक्षण विभागात काही एजंट बसले आहेत ते शिक्षकांकडून विविध कामे करून घेण्यासाठी पैसे मागत आहेत. जर शिक्षकांची अशी पिळवणूक होत असेल तर त्यांना वटणीवर आणले जाईल असेही त्यांनी सुचित केले.

कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सावंतवाडी दोडामार्ग या दोन तालुक्यात त्यांनी शिक्षकांच्या समस्या अडचणी संदर्भात बैठका घेतल्या. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राज्याचे सहकार्यवाह रामचंद्र घावरे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव गुरुदास कुसगावकर, भरत सराफदार, रमेश जाधव, चंद्रकांत पवार, लक्ष्मण गवस, सुमेधा नाईक, अर्चना सावंत आदींनी आपल्या समस्या व अडचणी स्पष्ट केल्या.
यावेळी आ. म्हात्रे पुढे म्हणाले, आपण आपल्या आमदार निधीतून यापुढे प्रत्येक शाळेत चांगल्या दर्जाचे ‘ई लर्निंग टीव्ही संच ‘ देणार आहोत. तसेच यापुढे गावागावात इंग्रजी माध्यमांचे फॅड व शाळांकडे जाण्याची संख्या कमी व्हावी यासाठी मराठी माध्यमांचे इंग्रजी पुस्तकात बदल केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागातील थकीत ४०० बिलांचे अनुदान आपण पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातून उपलब्ध करून आणून दिले आहे. यापुढे आता निवड श्रेणी असे असणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आ. म्हात्रे यांनी शिक्षकांच्या समस्या अडचणी संदर्भात आपण स्वतः लक्ष घातले आहे. शिक्षण विभागाला नियत कालावधी दिला आहे. त्या वेळातच आता शिक्षकांची कामे करण्यात येणार आहेत. कोणत्याही शिक्षकाला आता शिक्षण विभागाच्या कार्यालयात वारंवार हेलपाट्या माराव्या लागणार नाहीत. शिक्षकाने कोणते अधिकाऱ्यांसमोर वाद घालू नये. जो वाद घालायचा असेल तो घालण्यासाठी मी आहे. तुमची एक एक अडचण समस्या कशी सुटेल या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आदी उपस्थित होते.