सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 443 प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सोडण्याचे आदेश!

2 मे रोजी हे शिक्षक कार्यमुक्त होणार ; प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदांची संख्या 1109

सिंधुनगरी | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 443 प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून कार्यमुक्त करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शुक्रवारी काढले. हे शिक्षक 2 मे रोजी या जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त होणार असल्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये 1109 प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत.
आंतरजिल्हा बदलेतीस पात्र ठरलेल्या पण अनेक वर्षे रेंगाळलेल्या प्राथमिक शिक्षकांचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. शासनाच्या धोरणानुसार 309 प्राथमिक शिक्षक काही दिवसापूर्वी कार्यमुक्त करण्यात आले होते. शिल्लक राहिलेल्या 443 शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून सोडण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी दिले. तर पर जिल्ह्यातून या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने 22 शिक्षक दाखल झाले आहेत व 17 शिक्षक अजून येणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात शिक्षकांची एकूण 1109 पदे रिक्त झाली आहेत.

आंतरजिल्हा बदलीने पर जिल्ह्यात म्हणजे आपल्या मूळ जिल्ह्यात जाणाऱ्या सन 2017 पासून प्रलंबित होता. रिक्त पदे दहा टक्के च्या वर असतील तर अशा शिक्षकांना नो सोडण्याचे शासनाचे धोरण होते. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला होता. याची दखल अखेर शासनाला घ्यावी लागली. आंतरजिल्हा बदलीच्या ऑनलाइन प्रक्रियेत एकूण 785 बदली पात्र शिक्षक होते. त्यातील 752 प्राथमिक शिक्षकांचा आपल्या मूळ जिल्ह्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी बीएड बेरोजगाराने बेमुदत उपोषण केले होते. स्थानिकांना संधी मिळावी असा आग्रह त्यांनी धरला होता. प्राथमिक शिक्षकांच्या या भरतीपूर्वी राज्य शासन कोणता धोरणात्मक निर्णय घेते याकडे मात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहेत. पूर्वीची टीईटी व आताची टेट या दोन्ही परीक्षा रद्द करून राज्य शासनाने डेड बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या उमेदवारांनी लावून धरली आहे. केंद्र शासनाचे शिक्षक भरती संदर्भातील धोरण व राज्य शासनाचे धोरण याबाबत निर्णय होऊन प्रत्येक जिल्हा जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जातील असे अपेक्षा व्यक्त होत आहे.