सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई : निवती रॉक परिसरात सापडून आला होता ट्रॉलर
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग निवती रॉक समोरील १५ वाव समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणारा मंगलोर-कर्नाटक येथील सफान मोहोम्मद बावा यांच्या मालकीचा ‘सागर हितेश १’ (आयएनडी – केए-०१-एमएम-३९४१) हा हायस्पीड ट्रॉलर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने गुरवरी पकडला होता. दरम्यान, या प्रकरणी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त यांनी ट्रॉलर मालक सफान बावा यांना ९ लाख ७५ हजार ५ रुपये एवढा दंड ठोठावला आहे.निवती रॉक समोरील समुद्रात महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांचा भंग करून अवैध रित्या मासेमारी करणारा ‘सागर हितेश १’ (आयएनडी – केए-०१-एमएम-३९४१) हा हायस्पीड ट्रॉलर मत्स्य विभागाच्या शीतल गस्ती नौकेने गुरुवारी दुपारी १२.३० वाजता पकडला. या ट्रॉलर मध्ये तांडेल व नऊ खलाशी तसेच मासळी सापडून आली.या मासळीचा लिलाव दांडी आवार येथे करून लिलावाची रक्कम जमा करण्यात आली. तर हा ट्रॉलर ताब्यात घेऊन मालवण बंदरात जप्त करून ठेवण्यात आला आहे. ही कारवाई मत्स्य सहआयुक्त महेश देवरे आणि सहाय्यक आयुक्त एस. एस. अलगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी मुरारी भालेकर, पोलीस कर्मचारी भोगले, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दीपेश मायबा, सागर सुरक्षारक्षक दिवाकर जुवाटकर, शुभम राऊळ आदींच्या पथकाने केली.या ट्रॉलर बाबत परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तथा अभिनिर्णय अधिकारी, सिंधुदुर्ग मालवण यांच्याकडे प्रतिवेदन सादर केले होते त्यानुसार सहाय्यक आयुक्तांनी ट्रॉलर मालक सफान बावा यांना महाराष्ट्र सागरी मासेमारी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ९ लाख ७५ हजार ५ रुपये एवढा दंड ठोठावला आहे.