क्रीडा शिक्षकांचे राज्यस्तरीय मास्टर्स ट्रेनर्स शिबिराचा समारोप

State Level Masters Trainers Camp for Sports Teachers concluded

पालगड | वार्ताहर : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत क्रीडा शिक्षकांसाठी राज्यस्तरीय मास्टर्स ट्रेनर्स ट्रेनिंग बालेवाडी क्रीडा संकुलात नुकतेच पार पडले. या शिबिराकरिता राज्यातून एकूण 290 शारीरिक शिक्षण शिक्षकांनी सहभाग घेतला होता.राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. खेळामधील आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, नवीन खेळ व खेळांची माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत व्हावेत आणि राज्यातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळवण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरणार आहे. हे सर्व मास्टर ट्रेनर्स आपापल्या जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षित करणार आहेत. या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवडक दहा अशा राज्यभरातील क्रीडा शिक्षकांसाठी राज्यस्तरीय मास्टर्स ट्रेनर्स ट्रेनिंग म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथील आंतर राष्ट्रीय क्रीडा संकुलात घेण्यात आले.

या शिबिरात रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मा. किरण बोरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मास्टर ट्रेनिंगसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून क्रीडा शिक्षक उदयराज कळंबे- चिपळूण, भैरवनाथ पाटील- गुहागर, समीर कालेकर- चिपळूण, सत्यवान दळवी- दापोली, स्वप्नाली पवार व सैफन चरके- रत्नागिरी, रवींद्र वासुरकर- लांजा, अभिजीत कदम- संगमेश्वर, संतोष शिर्के व बापूराव मोरे- खेड निवड करण्यात आली होती.