Organizing hobby class for students, an initiative of Jagushte High School
रत्नागिरी : शहराजवळील कुवारबाव येथील श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्याच्या परीक्षा संपल्यावर उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात रस घेता यावा म्हणून छंदवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
छंदवर्गाचे तीन दिवस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा कात्रे यांनी दै. रत्नभूमीच्या संपादिका श्रीमती धनश्री पालांडे यांना छंदवर्गामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये पहिले दोन दिवस विनोदी कथांवर कथाकथन केले. संपादिका धनश्री पालांडे यांनी विद्यार्थ्याचा वयोगट बघून विनोदी कथाची निवड केली होती. एक दिवस विद्यार्थ्यांसाठी फॅब्रिक पेंटिंग कार्यशाळा व विद्यार्थिनींसाठी वीणकाम (क्रोशावर्क) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यार्थी- विद्यार्थीनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा कात्रे यांनी छंद वर्गाची आवश्यकता, विद्यार्थ्यांना त्याचा काय फायदा होऊ शकतो या बद्दलची सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. इयत्ता पाचवी ते आठवी मधील विद्यार्थी छंद वर्गाला उपस्थित होते. यावेळी शाळेच्या शिक्षिका नीलम कुलकर्णी व बेबी ताई पाटील यांनी यात सहभागी होऊन छंद वर्गाला चालना दिली.










