भविष्यात अपघात झाल्यास जबाबदार कोण? जितेंद्र चव्हाण यांचा सवाल
लांजा (प्रतिनिधी) गतवर्षी नव्याने बांधण्यात आलेल्या तालुक्यातील साटवली हायस्कूल नजीकच्या ब्रिज आणि परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.या भागात रस्त्याला जणू तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून या ठिकाणी अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार हे बांधकाम विभाग राहील, असा इशारा येथील भाजपाचे पदाधिकारी जितेंद्र चव्हाण यांनी दिला आहे
लांजा साटवली हा कायम वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावरून दररोज एसटीच्या दहा ते बारा फेर्या सुरू असतात .त्याचप्रमाणे अन्य खाजगी वाहतूक देखील सुरू असते .मात्र या साटवली हायस्कूल नजीक वहाळावर नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रिजसह रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात सध्या पावसाचे पाणी साचून या पाण्यामुळे या रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एकेक खड्डा हा मोठा खड्डा असल्याने त्याचा त्रास हा तिथून प्रवास करणारे पादुचारी, वाहन चालक आणि विद्यार्थी यांना सहन करावा लागत आहे.
या ब्रिज नजीकच हायस्कूल असल्याने या खड्ड्यातून वाहन गेल्यास चिखलाचे पाणी उडून विद्यार्थ्यांचे कपडे देखील खराब होत आहेत .मोठ्या प्रमाणात पडलेल्या या खड्ड्यांमुळे अतिशय बिकट अवस्था या ठिकाणी पहावयास मिळत आहे. त्यामुळे हा रहदारीचा रस्ता आहे की एखाद्या खेड्यातील रस्ता आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही .आणि म्हणूनच भविष्यात या ठिकाणी एखादा गंभीर अपघात झाला तर त्याकरता जबाबदार कोण? किंबहुना यांची सर्व जबाबदारी बांधकाम विभागाची राहील असा इशारा देखील येथील भाजपा पदाधिकारी जितेंद्र चव्हाण यांनी दिला आहे.












