एसटी होणार इकोफ्रेंडली ; व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती.!

 

कणकवली : ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने देखील आता पर्यावरण पूरक सेवेकडे वळण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दिशेने पाऊल देखील पुढे केलेले आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. ते कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शेखर चन्ने दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. या पत्रकार परिषदेत त्यांच्या समवेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, तसेच सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील उपस्थित होते.

पर्यावरण पूरक सेवेबाबत अधिक माहिती देताना शेखर चन्ने यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या सहा महिन्यात १००० सीएनजी बसेस येणार आहेत आणि त्यासाठी तीन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तब्बल ५३०० इलेक्ट्रिक बसेस टप्प्याटप्प्याने एसटीच्या ताफ्यामध्ये समाविष्ट केल्या जातील. या बसेस वातानुकूलित असणार असून ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा किफायतशीर दरात वातानुकूलित प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर ५००० बसेस मध्ये एलएनजी किट बसवून त्या एलएनजी वर चालवण्यात येतील. त्यासाठी एलएनजी पुरवठादाराची नेमणूक देखील करण्यात येणार आहे. डिझेल बसेसद्वारे होणारे प्रदूषण यामुळे पुष्कळ प्रमाणात कमी होईल आणि एसटी खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरक सेवा सर्वाना देईल.

सिंधुदुर्ग मधील कणकवली तसेच सावंतवाडी बस स्थानकांच्या दुरावस्थेबाबत पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी एसटी स्थानकांची पाहणी करून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल असे यावेळी सांगितले