न्यायादान करताना धैर्य महत्वाचे : न्या. अभय ओक

ठाणे : न्यायदान करताना केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही तर त्याच्या जोडीला धैर्य असणे गरजेचे आहे. जे रामशास्त्रीनी त्या काळात दाखवले होते, त्याला तोड नाही असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी शनिवारी ठाणे येथील टाऊनहॉलमध्ये मांडले. ज्येष्ठ वकील व लेखक विलास पाटणे यांनी लिहिलेल्या रामशास्त्री या चरित्रग्रंथाचा वकील संघटनाना प्रदान सोहळा न्या. ओक यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या छोटेखानी पण अत्यंत मुद्देसूद अशा भाषणामध्ये न्यायमूर्ती ओक यांनी अनेक दाखले दिले. ॲड पाटणे यांनी अनेक संदर्भ देवून रामशास्त्रीबाणा विषद केला आहे . न्यायव्यवस्थेतील रामशास्त्री हा आमचे समोर सर्वोच्च आदर्श आहे .बार कौन्सिलने संघटनांना पुस्तकं देण्याचा घेतलेला निर्णय उचित आहे परंतु रामशास्त्री केवळ वाचून चालणार नाही तर त्यांचं जीवन अनुकरणीय ठेवले पाहिजे .

छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ सतरा वर्षांचे रांझ्याच्या पाटलाला एका स्त्रीची छेड काढली म्हणून अत्यंत कठोर शिक्षा सुनावली होती. त्या काळात शिवरायांनी हे धाडस केले होते, असे सांगून न्या. ओक म्हणाले, रामशास्त्रीनीही अत्यंत निस्पृहपणे आपली भूमिका बजावली. सत्तेपुढे न झुकता त्यांनी न्यायनिवाडा केला ,असेही न्या ओक यांनी विषद केले .हा प्रकाशन समारंभ 24 एप्रिल रोजी झाला असता तर अधिक आनंद वाटला असता कारण याच दिवशी बरोबर 50 वर्षांपूर्वी केशवानंद भारती प्रकरणाचा निकाल आला होता. या निकालाचे दाखले नंतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये वेळोवेळी दिले गेले, असे न्या. ओक म्हणाले.

शहरांमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी महानगरपालिका, सिडको, एमएमआरडीए सारख्या व्यवस्था निर्माण करण्यात आल्या. देशभरात अशा व्यवस्था सर्वत्र उपलब्ध आहेत सर्वांचे काम करण्याची पद्धत आणि वृत्ती मात्र एकच आहे अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. शहराचा विकास करताना दूरदृष्टी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्याचा वेध घेऊन शहरे विकसित करावी लागतात. अन्यथा शहराचे आरोग्य बिघडते, असेही ते म्हणाले. केवळ 30 फूट रस्ता असलेल्या ठिकाणी वाढीव चटईक्षेत्र दिले तर तेथे उंच इमारती उभ्या राहतील. तेथील घरे केवळ श्रीमंत लोकांनाच परवडतील प्रत्येकाकडे तीन, चार वाहने असतील ती रस्त्यावर उभी राहतील. त्यातून वाहतुकीची व्यवस्था बिघडेल. त्यामुळे शहराचे नियोजन अत्यंत गांभीर्याने करावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍड. विलास पाटणे यांनी शास्त्रानुसार न्याय होईल अणि न्यायव्यवस्थेला नाती मंजुर नसतात ही रामशास्त्री यांची भूमिका स्पष्ट केली ऍड. वल्लरी जठार यांनी एमआरटीपी पुस्तकं संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ॲड गजानन चव्हाण यांनी प्रास्तविक व आभार व्यक्त केले .