आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या एका रेल्वेगाडीतून प्रवास करणार्या युवतीची परप्रांतिय युवकाने छेड काढली. त्यात जखमी झालेल्या युवतीवर त्याने अत्याचार केले. जखमी अवस्थेतील त्या युवतीला उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांकडून त्याच रेल्वेतून प्रवास करणार्या एका परप्रांतिय युवकाला ताब्यात घेतले. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मात्र कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या गाडीतील या प्रकारानंतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्गातील एका स्थानकावरून ही युवती त्या रेल्वेगाडीमध्ये चढली होती. त्या युवतीवर लक्ष ठेवून असलेला तो परप्रांतिय युवकही त्याच डब्यात शिरला. त्या डब्यात गर्दी कमी असल्याने त्याचा गैरफायदा घेत युवकाने तिची छेड काढली. त्याने केलेल्या गैरवर्तनानंतर घाबरलेल्या त्या युवतीने रेल्वे गाडीतून पळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात ती युवती जखमी झाली होती. त्याचा गैरफायदा घेत युवतीवर त्याने अत्याचार केले. याची माहिती तिने रेल्वे कर्मचार्यांना दिल्यानंतर प्रथम त्या युवतीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर रेल्वे पोलिसांकडून याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. स्थानिक पोलिसांनी शोध घेत त्या परप्रांतिय युवकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न व शारिरिक अत्याचार करणे यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.