Twenty years of ‘Nupurangan Nrityalaya’ in Ratnagiri!
कथ्थक नृत्यात घडविल्या उत्कृष्ट नृत्यांगना
रत्नागिरीच्या नृत्य क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान
रत्नागिरी : रत्नागिरीत कथ्थक नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण देणाऱ्या ‘नूपुरांगण नृत्यालय’ला वीस वर्षे पूर्ण होत आहेत. ‘नूपुरांगण नृत्यालय’च्या संचालिका, प्रसिद्ध नृत्यांगना, नृत्यशिक्षिका सौ. धनश्री नागवेकर-मुरकर यांनी गेल्या 20 वर्षांत रत्नागिरीत अनेक उत्कृष्ट नृत्यांगना घडविल्या आहेत. त्यामुळे ‘नूपुरांगण नृत्यालय’च्या माध्यमातून सौ. धनश्री नागवेकर-मुरकर यांनी रत्नागिरीच्या नृत्य क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. यावर्षी २०२३ मध्ये वीस वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ‘नूपुरांगण नृत्यालय’तर्फे वार्षिकोत्सव उत्साहाने साजरा केला जाणार आहे.
भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार कथकली, भरतनाट्यम, कुचीपुडी, मणिपुरी, ओडिसी अशा अनेक नृत्य प्रकारांमधून कथ्थक ह्या नृत्य प्रकाराची आपल्या रत्नागिरीमध्ये गेली वीस वर्ष अविश्रांत सेवा, सौ. धनश्री नागवेकर-मुरकर करत आहेत. कै. बाळासाहेब हिरेमठ, ज्यांनी खऱ्या अर्थी रत्नागिरीमध्ये कथ्थक कलेचे शास्त्रीय शिक्षण सुरु केले, त्यांचेकडे वयाच्या आठव्या वर्षी सौ. धनश्री यांच्या भगिनी सौ. प्रज्ञा कांबळी यांनी धनश्री यांना नृत्याचे धडे गिरविण्यासाठी नेले. तेंव्हापासून महाविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत १३ वर्षे त्यांनी हिरेमठ यांच्याकडे कथ्थक कलेचे शास्त्रीय शिक्षण घेतले आणि कथ्थक नृत्य विशारद ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर कथ्थकमध्ये डॉक्टरेट प्राप्त मुंबईतील विख्यात नृत्यांगना डॉ. सौ. मंजिरी देव यांच्याकडे तीन वर्षे कथ्थक नृत्य सराव शिक्षण पूर्ण केले.
नृत्यात निपुणता प्राप्त झाल्यावर सौ. धनश्री नागवेकर मुरकर यांनी २००३ मध्ये रत्नागिरी येथे आपल्या या कथ्थक कलेच्या आवडीचा प्रसार करण्यासाठी ‘नूपुरांगण नृत्यालय’ची स्थापना केली आणि त्याद्वारे नृत्यशिक्षण सुरु केले. यंदा ‘नूपुरांगण नृत्यालय’ तब्बल २० वर्षे पूर्ण करत आहे.
गेल्या २० वर्षात आठ मुलींनी (कु. अमोली केळकर, सौ. स्वरदा महाबळ-काटदरे, कु. रक्षंदा सावंत, कु. श्रिया शिंदे, कु. पूर्वा घाणेकर, कु. सिद्धी नलावडे, कु. आर्या केळकर, कु. अमिता वासावे) ‘नूपुरांगण नृत्यालय’च्या माध्यमातून ‘विशारद’ (सात परीक्षा) पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच आज पर्यंत किमान १५० मुलींनी कथ्थकचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे.
‘नूपुरांगण नृत्यालय’ने ‘अखिल भारतीय नाट्य संमेलन २०११’ आणि ‘मांडवी महोस्तव २०१८’ मध्ये कथ्थक कला सादर केली. तसेच रास नृत्यालय आयोजित ‘अखंड घुंगुरनाद’ (१२ तास) या कार्यक्रमात २०१९ आणि २०२२ मध्ये ‘नूपुरांगण नृत्यालय’ सहभागी झाले होते. ‘नूपुरांगण नृत्यालय’ तर्फे दरवर्षी कथ्थक हा शास्त्रीय प्रकार जनसामान्यांपर्यंत पोचावा म्हणून वार्षिकोत्सव साजरा केला जातो. ज्यामध्ये ‘नूपुरांगण नृत्यालय’च्या शिष्या नेटकेपणाने कार्यक्रम सादर करतात. आज पर्यंत रत्नागिरीकरांनी सर्वच कलांना आपलंस केलं आहे. तसचं या कार्यक्रमालाही भरभरून प्रतिसाद मिळतो. संचालिका सौ. धनश्री नागवेकर-मुरकर हे नाव रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिध्द असून त्यांना नृत्य परीक्षणासाठी निमंत्रण दिले जाते.
ध्यास लागला की, मार्ग सापडतो आणि मार्ग सापडला की जीवन सुकर आणि आनंदायी होत जातं, याच उत्तम उदाहरण सौ. धनश्री नागवेकर-मुरकर यांनी ‘नूपुरांगण नृत्यालय’च्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे. त्यांचे पती मंदार मुरकर आणि आई बाबा सौ. आणि श्री. नागवेकर तसेच बहिणी सौ. प्रज्ञा कांबळी आणि सौ. प्रिया पार्सेकर यांचा या कार्यात मोलाचा वाटा असल्याचे त्या आवर्जून सांगतात. गुरु भगिनी सौ. दर्शना लोध-कामेरकर, मुंबई यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. तसेच तबला वादक केदार लिंगायत, निखील रानडे, संवादिनीवर विलास हर्षे, सौ. प्राची रानडे आणि गायिका सौ. श्वेता जोगळेकर यांची अनमोल साथ ‘नूपुरांगण नृत्यालयाला’ लाभत आहे. भविष्यात ‘नूपुरांगण नृत्यालय’तर्फे नृत्यक्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संचालिका सौ. धनश्री नागवेकर-मुरकर यांनी यानिमित्ताने सांगितले.