बदलापूरच्या फार्मा कंपनीतील स्फोटात इन्सुलीतील तरुण ठार

Google search engine
Google search engine

पत्नी व मुलगी जखमी

बांदा (प्रतिनिधी) :

बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत  एका फार्मा कंपनीत सोमवारी पहाटे मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की रिऍक्टरचा १०० किलो वजनाचा एक भाग उडून तब्बल ४०० मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन पडला. या चाळीत सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावातील मेस्त्री कुटुंब राहत होते. सदरचा रिऍक्टर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या या कुटुंबाच्या बेडवर कोसळला. यात घनश्याम कृष्णा मेस्त्री (३५) याचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्याची पत्नी धनश्री हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांची छोटी मुलगी कु. ख्याती हिच्या सुद्धा पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर बदलापूर येथे उपचार सुरू आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास माणकिवली येथील एका फार्मा कंपनीत भीषण स्फोट झाला. या कंपनीतील रिऍक्टर जवळील रिसिव्हर टॅंकमध्ये स्फोट होऊन आग लागली आणि त्याचा सुमारे शंभर किलो  वजनाचा लोखंडी भाग उडून चारशे मीटरवर असलेल्या खरवई गावातील एका चाळीवर पडला. हा लोखंडी भाग घराचा छताचा पत्रा फोडून घरात साखर झोपेत असलेल्या घनश्याम मेस्त्री यांच्या पायावर पडला. त्यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. तसेच त्यांची मुलगी ख्याती व बायको धनश्री यांच्या सुद्धा पायाला गंभीर इजा झाली आहे.

 

स्थानिकांनी त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या घनश्याम यांना जेजे रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रात्री शस्त्रक्रिया झाली. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांची पत्नी व मुलीवर बदलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.