(संग्रहित छाया )
सर्जेकोट समुद्रातील घटना : चारही खलाशी बचावले : नौकेचे लाखोंचे नुकसान
मालवण | प्रतिनिधी : सर्जेकोट समुद्रात मंगळवारी मासेमारीस गेलेली नौका जोरदार वाऱ्यामुळे खडकांवर आदळल्याने दुर्घटना घडली. सुदैवाने चारही खलाशी सुखरूपपणे किनाऱ्यावर पोहचले. दरम्यान, राजेश कमलाकर शेलटकर यांच्या मालकीची या मच्छीमार नौकेचे सुमारे आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
स्थानिकांनी मच्छीमार नौका वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र वाऱ्यामुळे नौका खडकांवर आदळून समुद्रात बुडाली. यात इंजिन, जाळी व इतर साहित्यही वाहून गेले आहे.
राजेश शेलटकर हे आपल्या खलाशांसह मासेमारीसाठी सर्जेकोट समुद्रात गेले होते. सोसाट्यांच्या वाऱ्यामुळे मासेमारी नौका बांदा परिसरातील खडकाळ भागाकडे ढकलली गेली. त्यांनी आणि खलाशी यांनी नौका वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नौका वाऱ्याच्या वेगाने खडकाळ भागांमध्ये जात आदळून फुटली. नौकेमध्ये पाणी शिरू लागल्याने खलाशांनी तात्काळ समुद्रात उड्या घेत, सुखरूपपणे किनारा गाठला. मात्र नौका पूर्णपणे फुटून गेली. यात नौकेवरील सर्व जाळी आणि इतरही साहित्य समुद्रात वाहून गेले. यात राजेश शेलटकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मासेमारी बंदी कालावधीनंतर नवीन हंगामाच्या सुरूवातीलाच मोठी दुर्घटना घडल्याने सुमारे आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक मच्छीमारांना प्रयत्न करूनही नौका वाचविण्यात यश मिळाले नाही. स्थानिकांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र पूर्णपणे खडकाळ भागात नौका अडकून पडली होती. त्यात मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी घुसल्याने नौकेला जलसमाधी मिळाली.
खासदार नारायण राणे यांची भेट घेवून तातडीने दिशादर्शक दिप बसविण्यासाठी लक्ष वेधण्यात येणार असल्याचे नितीन परूळेकर यांनी सांगितले.