Enumeration of forced ownership land at Awashi
तुकाराम कदम यांची तिघांविरोधात खेड प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार
खेड | प्रतिनिधी : तालुक्यातील आवाशी गावात दि. २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या ८४/१ या नंबरने नोटीस बजावणी करून गुणदे येथील संजय आंब्रे, विक्रांत आंब्रे आणि प्रकाश आंब्रे यांनी दुसऱ्याची जमीन लाटण्याचं काम केले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आवाशी येथील तुकाराम कदम यांनी केली आहे. श्री. कदम यांनी याबाबतचे निवेदन प्रांत कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, ८४/१ या जमिनीचा मालक आजमुद्दीन परकार हे आहेत. मात्र, संजय आंब्रे, विक्रांत आंब्रे आणि प्रकाश आंब्रे यांनी ८४/१ हा उतारा स्वत:चा नसतानादेखील सरकारी मोजणी पोलीस बंदोबस्तात करून घेतली. याशिवाय श्री. कदम यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली. तसेच पोलिसांनी श्री. कदम यांना बोलावून संजय आंब्रे, विक्रांत आंब्रे आणि प्रकाश आंब्रे हे ८४/१ जागेची मोजणी करणार आहेत. याचबरोबर ९५/२ जमिनीची मोजणी होणार आहे, याबाबत तुमची काय तक्रार असेल तर लेखी द्या असे सांगितले. श्री. कदम यांनी ही मोजणी मला मान्य नाही या जागेची केस हायकोर्टात चालू आहे. तरी जबरदस्तीने मोजणी करण्यात आली आणि ८४/१अ१ब असे ७/१२ ची फोड करण्यात आली आणि तसेच ही जमीन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घाणेखुंट लोटे शाखेतून या जमिनीवर ५० लाखांचा बोजा चढवण्यात आला. यापूर्वी त्यांचे वडील दत्ताराम आंब्रे यांनीदेखील गरीब शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीन हडप करत होते असेही या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाला दीड महिना उलटून गेला आहे. तात्काळ माझ्या तक्रारी अर्जाचा विचार करून न्याय मिळवून द्यावा अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा तुकाराम कदम यांनी दिला आहे.