प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टीने रोजगारासाठी दिशादर्शक ठरणार;
२५ एप्रिलला आम.नितेश राणे यांच्याहस्ते जलपर्यटन सुविधेचा शुभारंभ…!
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला सागरी पर्यटन मोठ्या प्रमाणात लाभले आहे मात्र सह्याद्री पट्ट्यातही जलपर्यटनाचा आनंद लुटता यावा या उद्देशाने कणकवली तालुक्यातील कळसुली-देदोंनवाडी धरणात ‘बोटिंग व फिशिंग’ प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग असून खऱ्या अर्थाने रोजगार देणारा हा प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टीने दिशादर्शक ठरणार आहे या प्रकल्पाचा शुभारंभ २५ एप्रिल रोजी होत असल्याची माहिती प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी दिली.कणकवली येथील साई पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होत. यावेळी प्रतिष्ठानचे ट्रस्टी संदीप पालकर उपस्थित होते.
हनुमंत सावंत म्हणाले, २५ एप्रिल रोजी आम.नितेश राणे यांच्याहस्ते या जलपर्यटन सुविधेचा शुभारंभ होणार आहे. लघू पाटबंधारे विभाग, एमटीडीसी विभाग, मेरिटाईम बोर्डाची परवानगी घेऊन कळसुलीतील देदोंनवाडी धरणात ‘बोटिंग व फिशिंगी’ची सुविधा सुरु करण्यात आली आहे. हा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे. ‘बोटिंग व फिशिंग’च्या सुविधेमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून जलपर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कळसुली येणार आहेत.
प्रेमदया प्रतिष्ठान व सिंधुदुर्ग फॉर्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने कळसुली-देदोंनवाडी धरणात ‘बोटिंग व फिशिंग’ प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत दोन पॅडल बोट व स्पीड बोटद्वारे पर्यटकांना जलसफरीचा आनंद लुटता येणार आहेत. जलसफरीसाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितेताच्यादृष्टीने काळजी घेण्यासाठी मनुष्यबळासह सोयीसुविधा उपलब्ध आहेत. धरणामध्ये पर्यटकांना ‘फिशिंग’ आनंद लुटता यावा यासाठी धरणात मत्स्य बिज सोडण्यात आले आहे. पर्यटकांना जलसफरीचा आनंद माफक दरात लुटता येणार आहे. पर्यटकांना याठिकाणी राहता यावे, याकरिता त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे.कळसुली गावात येणाऱ्या पर्यटकांना धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे पाहता यावी, याकरिता दोन बैलगाड्यांची सोय करण्यात आली.कळसुली -देदोंनवाडी धरणात ‘बोटिंग व फिशिंग’ प्रकल्पसाठी ५३ हेक्टर तलाव असून या माध्यमातून खऱ्या अर्थाने पर्यटकांना बोटिंग फिशिंग पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या धरणांमध्ये जलपर्यटनाचा प्रकल्प सुरु करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. तसेच सिंधुदुर्ग असलेल्या धरणांमध्ये हा प्रकल्प सुरु होण्याकरिता शासनाच्या जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे हनुमंत सावंत यांनी सांगितले.
प्रेमदया प्रतिष्ठानतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांना शैक्षणिक साहित्य, गावांमध्ये मंदिराचा आर्थिक मदत, मेडिकल कॅम्प यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. कळसुलीत स्वामी समर्थ मठाची स्थापना केली जाणार असून या मठात १४ व १५ मे दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. विशेष म्हणजे भाविकाना दोन्ही वेळेचा महाप्रसाद दररोज मोफत दिला जाणार असल्याचे हनुमंत सावंत यांनी जाहीर केलं आहे.