चंद्रशेखर तेली
नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी
नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा
तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा
नागा रे भाऊराया तुला वहिल्या मी लाह्या
तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा ll
हिंदू सणातला हा श्रावणातला पहिला सण साजरा करताना महिला नागदेवतेला आपल्या भाऊराया मानून त्या दिवशी पूजा करतात.
या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धती भारतात रूढ आहे.नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते.
हिंदू धर्मात विविध प्राणी किंवा पक्षी यांना देखील देव मानले गेले आहे. आपल्या सर्व देवतांची वाहने प्राणी किंवा पक्षी आहेत. यामुळे त्याला विशेष स्थान देण्यात आले आहे. या पर्वात साप किंवा नागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हिंदू धर्मात नागाची पूजा केली जाते.
या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.
नागपंचमी सणाच्या वेगवेगळ्या आख्यायिका प्रचलित आहेत.
. एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. आणि या कारणामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी भाज्या चिरायच्या नाहीत , तव्यावर भाजायचे नाही व खलबत्त्यात कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. यावेळी नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. व खालील नवनाग स्तोत्र पठण करतात.
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।
शङ्खपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा॥1॥
एतानि नवनामानि नागानां च महात्मनाम्।
सायङ्काले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः ॥2॥
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ॥3॥
॥ इति श्री नवनाग नाम स्तोत्रम् सम्पूर्णम्॥
अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.
भविष्य पुराणात मात्र वेगळेच नाग सांगितले आहेत. खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय, असे वेगळेच नाग सांगितले आहेत.
वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥
— (भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)
श्री नवनाग स्तोत्र पठण केल्याने कालसर्प दोष दूर होतो.
नवनाग स्तोत्राचे पठण केल्याने मनुष्याला सर्व कार्यक्षेत्रात यश मिळते.
याचे पठण केल्याने व्यक्तीला शत्रूंवर विजय प्राप्त होतो.
भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते.नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते . नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याला पूजा करायची सुरुवात केली.
नागपंचमी पूजा करताना महिला आणि पुरुष
दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.
पूर्वी नागपंचमीच्या सणापूर्वी ८ ते १० दिवस आधी सर्व लहानथोर स्त्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणायच्या. झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळं करायच्या.
या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा-फुगडीसारखी नृत्ये व खेळ खेळतात.
नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करताना महिला
या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळाकडे जाऊन वारुळाची पूजा करतात. भारताच्या काही भागात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते. दूध- लाह्या चा प्रसाद दाखवला जातो.
नाग पूजनाची परंपरा भारताच्या सर्वराज्यातआढळते.
प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीत नाग नृत्याचा प्रचार झालेला दिसून येतो. नागपूजेचा संबंध सर्जनशक्तीशी मानला जातो. नागाचा आणि पृथ्वीचा एकमेकांशी असलेला पवित्र संबंध आपण मान्य केला आहे.
आजचे नागपंचमीचे व्रत करताना दात काढलेल्या आणि उपाशी ठेवून टोपलीतून आणलेल्या नागांचा छळ थांबविणे करणे गरजेचे आहे.
नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्यामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. आपल्याकडे सर्पमित्र म्हणून अनेकजण याबाबत चांगले काम करीत आहेत. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. उंदरांच्या पोटात शेकडो टन जाणारे धान्य वाचवावे लागेल. कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे. नाग आणि साप हे शेताचे रक्षणकर्ते आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो.
हा सण साजरा करताना सापा विषयी मनातील भीती कमी करून त्यांना जीवदान देण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मासात पूर्ण करावा.
असे हे नागपंचमीचे व्रत आपल्या प्रत्येकाच्या भावविश्वाशी जोडले गेले आहे.
लोकगीतातून , भावगीतातून पंचमीचे महत्व अधोरेखित झालेले पाहावयास मिळते. आणि आठवण येते गदिमानी लिहिलेल्या ” फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे, व पंचमीचा सण आला डोळे माझे ओले” या गीतांची. तसेच लोकगीतातून ऐकु येणारे…
चल गं सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायाला पूजायाला ।
ताज्या लाह्या वेचायाला वेचायाला, हळदकुंकू वाहायाला वाहा याला….
या सणाची जनमाणसातील आपले अढळ स्थान लक्षात आणून देते.













