कोलगाव येथील जंगलमय परिसरातील घटना
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरालागत असलेल्या कोलगाव येथील एका जंगलमय परिसरात गांजा सेवन केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासमवेत अन्य दोघांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली.
दोन स्थानिक युवकांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून गांजा सेवन करणाऱ्या त्या तिघांनाही ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या तिघांचीही चौकशी सुरू होती. यात एका अल्पवयीन युवकाचा समावेश असून त्याला समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तर इतर दोघांवर गांजा सेवन केल्याप्रकरणी तसेच गांजा बाळगल्याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे. याबाबत अधिक चौकशी सुरू असून या प्रकरणी अजून काही जण हाती लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, घटनास्थळावर संबंधित युवकांकडे काही प्रमाणात गांजा प्राप्त झाला असून त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशीनंतर पुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.