देशातील रिकामटेकड्या लोकप्रतिनिधी यादीत यांची नावे अग्रक्रमांवर
भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचा जोरदार प्रहार
मालवण | प्रतिनिधी : भाजपच्या विकास कामांना आपले स्टिकर लावणे हेच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचे काम आहे. असा जोरदार शाब्दिक प्रहार भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.
सत्तेमध्ये असतानाही आठ वर्षात रिकामटेकडे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक अणाव व वराड-सोनवडे या दोन पुलांचे काम पूर्ण करून घेण्यात अपयशी ठरले. मात्र मागील आठ महिन्यात भाजप युती सरकार सत्तेत येताच पुलांच्या कामाला गती मिळाली. पुलाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन अधिकारी वर्गासोबत पाहणी केली. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कामातील तांत्रिक समस्या दुर केल्या. आता पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण होत आहे. ही माहिती मिळताच श्रेय घेण्यासाठी नाईक, राऊत त्याठिकाणी पोहचले. जून महिन्यात काम पूर्ण झाले पाहिजे अशी नौटंकी केली. मात्र मे अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण झाले पाहिजे या सूचना अधिकारी व ठेकेदार यांना समजेल अश्या शब्दात आपण ग्रामस्थां समक्ष यापूर्वीच दिल्या. त्यानुसार काम होत आहे हे पाहून दुसऱ्याच्या कामाला स्टिकर लावण्याचे काम वैभव नाईक, विनायक राऊत करत आहेत. असा जोरदार प्रहार भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केला.
आमदार, खासदार आहात याची थोडी तरी लाज बाळगा. जे तुम्हाला नऊ वर्षात जमले नाही ते एका महिन्यात करा असे अधिकाऱ्यांना सांगत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करताना जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचे धंदे बंद करा. नाहीतर देशातील रिकामटेकड्या लोकप्रतिनिधी यादीत तुमची नावे अग्रक्रमांवर असतील. असा टोलाही निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांना लगावला.











