दापोली : वाकवली येथे साडेचार वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू 

 

 

नदीवर कचरा टाकण्यासाठी गेला असताना घडली दुर्घटना

दापोली l प्रतिनिधी :  दापोली तालुक्यातील वाकवली नवानगर गिरण येथील साडेचार वर्षाच्या बालकाचा नदीत बुडून मृत्यू झाला असून सदरच्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

सदर घटना १६ ऑगस्ट शुक्रवार सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून सिरजल कमल भूजल असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. सदर घटनेची फिर्याद कमल भूजल यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. कमल भुजल नेहमीप्रमाणे कामावर गेले होते दरम्यान आठ वाजता त्यांच्या पत्नीने कॉल करून आपला मुलगा सिरजल नदीच्या पाण्यात पडल्याची माहिती दिली यानंतर कमल हे घरी परत येऊन तातडीने मुलाला खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र सिरजलची प्रकृती अधिकच खालावल्याने डॉक्टरांनी आपल्या गाडीतून सिरजलला दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेले. कमल यांच्या पत्नीने मुलगा सिरजल याला कचरा टाकण्याकरिता पाठवले होते तो बराच वेळ आला नाही म्हणून तीने आरडाओरड सुरू केली. गावातील माजी पोलीस पाटील गणपत आंबेकर, मनोज कोळेकर यांची पत्नी आणि अनिता मोहिते यांनी शोधाशोध सुरू केली. शोधाशोध सुरू असताना मुलगा घराजवळील नदीच्या पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले.

 

 

 

ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून खाजगी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासून साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिरजल मृत्यू झाल्याचे घोषित केले. दापोली पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुकाळे करित आहेत.