देवदर्शनाला जायचंय? ऑनलाईन बुकिंग करताय तर सावधान!

Want to go to Goddarshan? Be careful while booking online!

मोबाईलवर येणारा ओटीपी कोणालाही द्याल तर फसाल!

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्टच्या भक्त निवासमध्ये खोली बुक करून देण्याच्या बहाण्याने १४ जणांना फसवले

मुंबई : अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्टच्या भक्त निवासामध्ये खोली बुक करून देण्याच्या बहाण्याने फसविणाऱ्या दोन सायबर चोरांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. या तिघांनी एका महिलेची तीन लाख रुपयांची फसवणूक केली होती.

पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट यांच्याकडे अशा प्रकारच्या तब्बल १४ तक्रारी आल्याचे उघडकीस आले आहे. या फसवणुकीतही या तिघांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा येथील एका महिलेला तिच्या वृद्ध आईवडिलांना अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी न्यायचे होते. अक्कलकोट येथील भक्तनिवासातील खोली राहण्यासाठी बुक करायची असल्याने तिने गुगलची मदत घेतली. गुगलवर अक्कलकोट संस्थांनचे नावे असलेली एक वेबसाइट तिला दिसली. तिने या वेबसाइटवरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता फोनवरील व्यक्तीने सुशीलकुमार असे नाव सांगितले. महिलेला भक्तनिवासचे फोटो व्हॉट्सअॅपद्वारे पाठविले. त्यानंतर खोली बुक करण्यासाठी २,२०० रुपये ‘जीपे’मार्फत पाठविण्यास सांगितले.

वारंवार प्रयत्न करूनही पैसे जात नसल्याने सुशीलकुमार याने या महिलेकडून ओटीपी मागून घेतला. त्यानंतर टप्याटप्याने तिच्या खात्यावरून तीन लाख नऊ हजार रुपये वळविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातून शाहरुख शरीफ खान आणि सौरभ विशालसिंग गुर्जर या दोघांना अटक केली. तर त्यांचा एक साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.