‘Insense Media Expo’ held in Mumbai on May 6 and 7 for Micro, Small and Medium Enterprises
मुंबई (प्रतिनिधी) : गोरेगाव (पू.) नेस्को येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे ६ व ७ मे रोजी ‘इनसेन्स मीडिया एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात इनसेन्स, सुगंधी द्रव्ये, साबण आणि डिटर्जंट क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत. या क्षेत्रातील बहुतेक कंपन्या या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्रात मोडतात. हे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन म्हणजे अगरबत्ती, सुगंधी द्रव्य, पूजेशी संबंधित साहित्य, साबण व डिटर्जंट, टॉयलेटरीज व सौंदर्यप्रसाधने यांचे उत्पादक, पुरवठादार तसेच पॅकेजिंग, मशिनरी, ई-कॉमर्स पुरवठादार यांच्याशी किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, वितरक यांना जोडले जाण्याची एक संधी आहे. तसेच अशा प्रदर्शनांमुळे विशेषतः सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांना राष्ट्रीय व जागतिक बाजारापेठांपर्यंत वाजवी खर्चात पोहोचण्याचे माध्यम प्राप्त होत आहे.
भारतातील अगरबत्ती व्यवसायाची उलाढाल एक अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे आणि यात दर वर्षी १५% वाढ होण्याची शक्यता आहे. अगरबत्ती व जाळून गंध निर्माण करणाऱ्या उत्पादनांच्या बाबतीत असलेल्या आयात धोरणात सुधारणा करण्यात आली. आधी या संदर्भात मुक्त आयात होती, ती आता मर्यादित करण्यात आली. त्यामुळे या क्षेत्राला चालना मिळाली आहे. या क्षेत्रातील बहुतेक कंपन्या या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्रात मोडतात. ही युनिट्स असंघटित आणि विभागलेली आहेत. पण या धोरणबदलामुळे त्यांच्यातील स्पर्धा वाढली आणि उत्पादकता वाढण्यासाठी या युनिट्समध्ये आधुनिकीकरण आले. त्यामुळे भारताच्या निर्यातीमध्ये १,००० रु. कोटींची वाढ झाली आणि जागतिक बाजारपेठेत १०% हिस्सा प्राप्त झाला. भारतातील साबण क्षेत्राची उलाढाल सुमारे ३.५ अब्ज अमेरिकन डॉलरची आहे.
इनसेन्स मीडिया एक्स्पोचे आयोजक दीपक गोयल यांनी सांगितले की, ‘आमचे बी २ बी मीडिया हाऊस भारतीय इनसेन्स-सुगंधी द्रव्ये (परफ्युम), साबण-डिटर्जंट, चहा व कॉफी आणि पादत्राणांच्या क्षेत्राच्या विकासासाठी काम करते. प्रकाशने, प्रदर्शने, बिझनेस प्रमोशन इव्हेंट्स व परिषदांच्या माध्यमातून हा विकास साधला जातो. यासारख्या व्यासपीठांमुळे सहभागींना, विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना राष्ट्रीय व जागतिक बाजारापेठांपर्यंत वाजवी खर्चात पोहोचण्याची संधी प्राप्त होते’. ‘इनसेन्स मीडिया एक्स्पो’मध्ये इनसेन्स तयार करण्याची तंत्रे व सुगंधनिर्मितीच्या प्रक्रियांविषयी माहितीपूर्ण चर्चासत्रे व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या एक्स्पोमध्ये १६५ हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार आहेत आणि या ठिकाणी दहा हजारांहून अधिक निर्णयकर्ते उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तामिळनाडूमधील डेल्टा ब्रँड हे ‘इनसेन्स मीडिया एक्स्पो’चे प्रमुख प्रायोजक आहेत.