आम. नितेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर ५ दिवसांनी फोंडाघाट-राधानगरी एसटी वाहतूक सुरू ! सर्वत्र समाधान

Common. Fondaghat-Radhanagari ST traffic started after 5 days after Nitesh Rane’s warning! Satisfaction all around

प्रशासकीय ताळमेळ- नियोजनाच्या अभावामुळे प्रवासी- व्यापारी मध्ये संतापाची भावना 

पुर्वी एस टी स्टँडवरून सुटणाऱ्या अथवा वळविलेल्या गाड्या तातडीने पुन्हा सुरू करण्याची फोंडावासियांची मागणी !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : फोंडाघाट-राधानगरी-भोगावती मार्गावरील एसटी वाहतूक, अखेर नितेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर, पाचव्या दिवशी सुरू झाल्याने सुमारे १४ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर व्यापारी- प्रवासी- नागरिक आणि प्रवासी संघटनेमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्वांनी आम. नितेश राणे, आम. आबिटकर,शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आग्रे, कणकवली- कोल्हापूर -राधानगरी पत्रकार सहकारी,विशेष प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे तसेच प्रसिद्धी माध्यमांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत. मात्र प्रशासनाच्या गतिमान आणि वेगवान निर्णयाबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त होताना, यात कार्यक्षमतेने बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एक एप्रिल पासून दाजीपूर राधानगरी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर, कोकणातील लांब पडल्याच्या फोंडाघाट एसटी स्टँडवरून सुटणाऱ्या गाड्या, वैभववाडी गगनबावडा मार्गे वळविण्यात आल्या. तर काही बंदही करण्यात आल्या. त्यामुळे दाजीपूर- राधानगरी- निपाणी- भोगावती इत्यादी घाट माथ्यावरील भागात जाणाऱ्या- येणाऱ्या प्रवाशांना,व्यापाऱ्यांना उरफाटा प्रवास दगदग, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र पाच-सहा दिवसातच वनविभागाने हरित पट्ट्यातील कामास हरकत घेतल्याने इतर वाहतूक म्हणजे कंटेनर . चिरे- वाळूचे ट्रक , ट्रॉलर इत्यादी अवघड वाहनांसह चार चाकी वाहने कोणाच्या आशीर्वादाने अथवा आर्थिक उलाढाली तून खुलेआम सुरू झाली .आणि आज अखेर प्रशासनाचाच भाग असलेली एसटी केवळ नोटिफिकेशनचे कारण देऊन गेले १४ दिवस बंद ठेवण्यात आली?

याकडे आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अहवाल सादर करण्याची आणि एसटी तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. कोल्हापूर-सिंधुदुर्ग पत्रकार सहकारी,सोशल मीडिया, आमदार अबिटकर, जिल्हाध्यक्ष संजय आग्रे, यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदनही दिले. अखेर १४ दिवसांनी एसटी वाहतूक पुन्हा सुरू झाली. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिफिकेशन रद्द केले.मात्र या दरम्यान प्रवासी बाजारपेठेतील व्यापारी यांचे मध्ये या प्रशासकीय कामकाजाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होती. गेल्या १४ दिवसात या बंद मार्गावरील व्यापार उदीमावरही प्रतिकूल परिणाम झाल्याचे चित्र आहे.

या प्रकारामुळे प्रशासनाच्या विविध भागातील अधिकाऱ्यांचा वेळ काढूपणा दिसून येत असल्याने, फोंडाघाट स्थानकावरून यापूर्वी सुटणाऱ्या अथवा बावडा मार्गे वळविलेल्या सर्व गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, अथवा फोंडाघाट एसटी स्टँडवरूनच राधानगरी अथवा बावडा मार्गे पुढे जाव्यात, अशी आग्रही मागणी फोंडाघाट प्रवासी आणि व्यापारी संघटनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असेही कळविण्यात आले आहे…