Tata Metallic and Uttam Steel should be replaced by ArcelorMittal
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
बारसू रिफायनरी बाबत ठाकरे गटाची भूमिका दुटप्पी
सावंतवाडी । प्रतिनिधी : रेडी येथील बंद असलेली टाटा मेटॅलिक कंपनी तसेच सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनी यांची जागा ताब्यात घेऊन ती आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनीला देण्यात यावी अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. सदरचा उद्योग सावंतवाडी तालुक्यात सुरू झाल्यास बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल तसेच चिपी विमानतळाचे भवितव्य ही उज्वल होईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी उपस्थित होते.
स्टील उद्योग समूहामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी असलेल्या आर्सेलर मित्तल निप्पाॅन स्टील कंपनीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यात सातार्डा परिसरात उत्तम स्टील कंपनीने २५ वर्षांपूर्वी संपादीत केलेली २२ एकर जागा सदर कंपनीच्या ताब्यात देण्यात यावी. उद्योग येऊन रोजगार मिळेल या अपेक्षेने स्थानिक शेतकर्यांनी कवडीमोल दरात ही जागा दिली होती. मात्र, कित्येक वर्ष हा प्रकल्प उभारण्यात न आल्याने ज्या उद्देशाने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल दराने कंपनीला दिल्या तो उद्देश साध्य झाला नाही. त्यामुळे ही जमीन शासनाने तात्काळ उत्तम स्टील कंपनीकडून ताब्यात घेऊन ती असलेंर मित्तल निप्पाॅन स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला द्यावी अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे सांगितले.
रेडी येथेही प्रथम उषा उस्पात व त्यानंतर टाटा मेटॅलिक कंपनीने उद्योग सुरु केला होता. मात्र, सद्य स्थितीत तो बंद आहे. त्यामुळे ती जागाही सदर कंपनीला देण्यात यावी. रेडी पोर्टचाही त्यामूळे फायदा होईल. कारण आर्सेलर मित्तल ही जवळपास ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक करणार असून हा प्रकल्प उभा राहिल्यास गोव्याला रोजगारासाठी जाणाऱ्या इथल्या युवकांना तालुक्यातच रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्थानिक जनतेशी चर्चा करून कंपनीला येथे संधी द्यावी यासाठी आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाणार बारसू येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरुन चुकीचे राजकारण सुरु आहे.या प्रकल्पाबाबत ठाकरे गटाची भूमिका दुटप्पी आहे. त्यांचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाला समर्थन दिले आहे. मात्र, खासदार विनायक राऊत हे विरोधात बोलत आहेत. दोन टर्म ज्यांनी खासदारकी उपभोगली त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणता उद्योग आणला हे जाहीर करावे. कोकणाचे भलं कशात आहे हे न पाहता राऊत येणाऱ्या उद्योगाला विरोध करून नेमकं काय साध्य करणार, असा सवालही तेली यांनी उपस्थित केला.
खऱ्या अर्थाने कोकणचा विकास व्हायचा असेल तर ग्रीन रिफायनरी सारखे प्रकल्प येथे उभे राहणे गरजेचे आहे. कोकण विकासाला चालना देण्यासाठी ग्रीन रिफायनरी प्रकल्प ही एक संधी आहे. मात्र, आज बाहेरून माणसे आणून प्रकल्पाला विरोध असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामुळे बारसू येथील स्थानिक जनतेने अशा लोकांपासून दूर राहावे व योग्य अभ्यास करून निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेतं : राजन तेली
विधानसभेच्या कुठल्या जागा कोणाला सोडाव्यात या संदर्भातील निर्णय भाजपा पार्लमेंटरी बोर्ड घेणार आहे, त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून केलेले वक्तव्य हे त्यांच्या पक्षवाढीच्या दृष्ठीने होते. कार्यकर्त्याच्या बैठकीत असे बोलावेच लागते, असे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी स्पष्ट केले. तर आधी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये ताकद पाहूया व नंतर विधानसभेचा विचार करू असेही ते म्हणाले.