Chetan Chavan will give justice to cheated youths
पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे लक्ष वेधले!
दोडामार्ग | सुहास देसाई
एका फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून गरजू कर्जदारांकडून फी स्वरूपात रोख रक्कम उकळून त्यांची लाखोंची फसवणूक करण्याचा प्रकार दोडामार्ग तालुक्यात उघडकीस आला आहे.याबाबत येथील पोलीस ठाण्यात तक्रार देखील देण्यात आली असून फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे फसवणूक करणारी तालुक्यातीलच एक तरुणी असल्याचे बोलले जात आहे.काही वर्षांपूर्वी तालुक्यात शेअर्स मार्केटच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार घडला होता त्यांनतर बऱ्याच वर्षांनी फसवणुकीचे हे नवे प्रकरण उघडकीस आल्याने अनेकाचे व त्याला सहकार्य करणारे यांचे धाबे दणाणले आहे.
गेल्या काही दिवसात फायनान्स कंपन्यांकडून लाखोंची कर्जे मिळवून देण्याची बतावणी करून गरजू कर्जदारांकडून फी स्वरूपात रक्कम घेऊन नंतर त्यांची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. असाच प्रकार नुकताच दोडामार्ग तालुक्यात उघडकीस आला आहे.तालुक्यातील ऐका गावातील तरुणीने एका फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मिळवून देण्याचे सांगून गरजू कर्जदारांकडून फी स्वरूपात रक्कम घेतली . पाच लाख रुपयांचे कर्ज हवे असल्यास ४२ हजार फी ची रक्कम अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फी म्हणून लाखो रुपये अनेक गरजू कडून घेतले.कमी कालावधीत आणि विना कटकटीशिवाय कर्ज मिळणार या आशेने या कर्जाच्या भोवऱ्यात अनेकजण अडकले आणि सुरुवातीची प्राथमिक फी म्हणून रक्कम जमा केली.मात्र रक्कम जमा केल्यानंतर अनेक दिवस उलटले तरी कर्ज मिळत नसल्याने संबंधित तरुणीकडे फी स्वरूपात रक्कम देणाऱ्या गरजूनी विचारणा केली असता तिच्याकडून तारीख पे तारिक देण्यात आली मात्र कर्ज काही मिळाले नाही त्यामुळे आपली या संपूर्ण प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच त्या गरजूच्या पायाखालची वाळूच सरकली.त्यामुळे फसवणूक झालेल्या सर्वांनी एकत्र येत संबंधित तरुणीच्या घरी जात याबाबत जाब विचारला असता तिने आपण ही रक्कम अन्य एका व्यक्तीकडे दिल्याचे सांगितले. व उडवाउडवीची उत्तरे दिली.एवढ्यावरच त्या तरूणिने न थांबता पोलीस ठाणे गाठून स्वतःला संरक्षण देण्याचा अर्ज देखील पोलिसांना दिला असून फसवणूक झाल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या गा लोकांचीच तक्रार केली आहे.
दरम्यान फसवणूक झालेल्या गरजू कर्जदारांनीही पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे परंतु तरीही या तक्रारीवर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याची चर्चा आहे.उद्या या प्रकरणात फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहते यावरच या संपूर्ण प्रकरणाचा तपास अवलंबून असणार आहे.
दरम्यान या प्रकरणी दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण व माजी नगरसेवक भाजपा माजी शहराध्यक्ष समीर रेडकर यांनी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे लक्ष वेधले असून यासाठी आवश्यक ती कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली याबाबत पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी प्रहारशी बोलताना फसवणुक झालेल्या युवकांनी पुढाकार घेऊन तक्रार दाखल करावी संबंधितांनी तशी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करून अधीक तपास करणार असल्याचे सांगीतले.