कोत्रेवाडी ग्रामस्थ टाकणार आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार

 

जोर जबरदस्तीने डम्पिंग ग्राउंड प्रकल्प लादण्याचा प्रयत्न , प्रशासनाचे दुर्लक्ष

संतोष कोत्रे | लांजा :  ग्रामस्थांचा विरोध डावलून कोत्रेवाडी येथे जोर जबरदस्तीने डम्पिंग ग्राउंड प्रकल्प लादण्याच्या लांजा नगरपंचायत प्रशासनाच्या भूमिके विरोधात ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी आणि नगरपंचायत प्रशासनाकडे वारंवार अर्ज- विनंती आणि आंदोलने करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर ग्रामस्थांनी आगामी विधानसभेसह सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

 

लांजा नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे भोंगळ कारभार करून आणि बोगस प्रस्तावाद्वारे वाडीवस्तीजवळ डम्पिंग ग्राउंड प्रकल्प लादून जनजीवन उध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला गेला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, लांजा तहसील कार्यालय ,नगरपंचायत प्रशासन यांच्याकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली होती. अनेक वेळा या विरोधात आंदोलने ,उपोषणाचा मार्ग देखील अवलंबण्यात आला होता. मात्र तरी देखील ग्रामस्थांच्या न्याय हक्काकडे नगरपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे .
लांजा नगरपंचायतीकडे घनकचरा प्रकल्पासाठी इतर अन्य जागांचे प्रस्ताव उपलब्ध असताना देखील नगरपंचायत कोत्रेवाडी या एकाच जागेवर अडून बसली आहे.

 

 

मुळातच या प्रस्तावित जागेकडे जाण्यासाठी शासनाचा अधिकृत रस्ता नाही आणि लगतच जलस्त्रोत आहेत. तसेच वाडी वस्ती जवळ आहे. सदर जागेची पाहणी जिल्हा समितीने करून शासनाच्या निकषात अयोग्य असल्याचा अहवाल यापूर्वीच दिलेला आहे. असे असताना देखील नगरपंचायतीकडून कोत्रेवाडी येथीलच जागेवर अट्टाहास धरला आहे .याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे .
अशाप्रकारे कोत्रेवाडी ग्रामस्थ आपल्या न्याय हक्कांसाठी, अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत असताना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणूनच घटनेने आपल्याला दिलेल्या मतदानाच्या अधिकारावर नगरपंचायत, तहसील प्रशासन व अन्य प्रशासनाकडून एक प्रकारे बाधा येत असल्याचे कोत्रेवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आणि म्हणूनच आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोत्रेवाडी ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत लवकरच लांजा तहसील, नगरपंचायत व सर्व प्रशासनाला निवेदन सादर करून आपला निषेध ग्रामस्थ व्यक्त करणार आहेत.