खेडमधील वाडी जैतापूर पोलिस पाटीलाचा प्रामाणिकपणामुळे मूळ मालकाकडे परत
खेड (प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील वाडी जैतापूर गावचे पोलिस पाटील बाळकृष्ण कासार याना बुधवारी दुपारी दुचाकीवर प्रवास करताना भरणे खेड रस्त्यावर सापडलेले पाकीट संबंधित व्यक्तीला परत करून प्रामाणिक पणाचे दर्शन घडवले.
कासार हे दुचाकीने प्रवास करत असताना त्यांना भरणे खेड रस्त्यावर पडलेले एक पाकीट मिळाले. त्यांनी पाकीट उघडून बघताच त्यामध्ये आधार कार्ड,पॅनकार्ड व महत्त्वाची कागदपत्रे मिळाली.त्याच प्रमाणे रोख रक्कम ९ हजार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नेमकं पाकीट कुणाचे आहे चौकशी करता, पकिटातील आधार कार्डवर प्रदीप गमरे(रा. सोंडे, बौद्धवाडी) यांचे नाव व फोन नंबर होता.
पोलिस पाटील बाळकृष्ण कासार यांनी फोन लाऊन त्यांना बोलाऊन घेतले व हरवलेले पाकीट ९ हजार ही रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे सुपूर्द केले. त्यांचा हा प्रमाणिकपणा पाहून प्रदीप गमरे भारावले, म्हणाले हे ९ हजार रुपये मी दवाखान्यात एका रुग्णाचे बिल भरण्यासाठी घेऊन जात होतो. प्रामाणिकपणा बद्दल बाळकृष्ण कासार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.











