खेड आगारातील आरक्षण खिडकी बंद

The reservation window in Khed Agar is closed

खेड | प्रतिनिधी : येथील खेड बसस्थानकात विजेच्या उच्च दाबामुळे शॉर्टसर्किट होऊन संगणक, इन्व्हर्टर, प्रिंटर जळल्यामुळे येथील आरक्षण खिडकी बंद आहे.

शाळेला सुट्टी पडल्यामुळे फिरायला व नातेवाईकांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढलेली असताना बसस्थानकातील आरक्षण खिडकी बंद असल्याने
अनेकांना आरक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.
खेड बसस्थानकावर रविवारी अचानक विजेचा दाब वाढल्यामुळे येथील आरक्षण खिडकीमधील उपकरणे जळाली. काही कळण्याच्या आत घडलेल्या या घटनेमुळे कर्मचाऱ्यांनी लागलीच विजेचा प्रवाह बंद करून संभाव्य घटना टळली, मात्र यात साहित्याचे नुकसान झाले.

खेड आगारात अतिरिक्त संगणक संच उपलब्ध नाही. तर संगणक दुरुस्तीसाठी रत्नागिरी येथे पाठविण्यात आल्याने तो दुरुस्त होईपर्यंत आरक्षण खिडकी बंद
राहणार आहे. याचा मनस्ताप प्रवाशांना झाला. तर खेड आगाराचे हजारो रुपयाचे उत्पन्न बुडाले आहे. याची गंभीर दखल विभाग नियंत्रक रत्नागिरी यांनी घेऊन तत्काळ संगणक संच उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.