अग्निपंख महिला प्रभाग संघ मालदोलीचा धाडशी निर्णय
केरळच्या धर्तीवर हाऊस बोट प्रकल्पाची निर्मिती
चिपळूण (वार्ताहर) : कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी तसेच बचत गटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वाशिष्टी दाभोळ खाडीत मालदोली येथील अग्निपंख प्रभाग संघाच्या महिला केरळच्या धरतीवर हाऊस बोर्डचा प्रकल्प राबवणार आहेत. या खाडीत सफर करताना केरळ पेक्षाही अप्रतिम निसर्ग सौंदर्याची अनुभूती पर्यटन घेणार आहेत. शिवाय मगरीसह विविध पक्षी पाहण्याचा निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे . आम्ही हा प्रकल्प यशस्वीपणे राबवू असा आम्हाला विश्वास आहे, असे अग्निपंख महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष दीपिका कुळे यांनी सांगितले .
जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी पाच ठिकाणी हाऊस बोट प्रकल्प सुरू होत आहे. त्यामध्ये दाभोळ खाडीचा ही समावेश आहे. वाशिष्ठीच्या मुखावर असलेल्या दाभोल खाडी या हाऊस बोटीतून या खाडीतील जैवविविधता, मगर सफारी, पांडवकालीन लेणी, गरम पाण्याचे कुंड, कांदळणवनाची बेटे आणि नारळी पोफळीच्या बागा असा निसर्ग रम्य परिसराचा अनुभव घेता येईल. एक कोटी खर्चाच्या या हाऊस बोट मध्ये दोन वातानुकूलित खोल्या असून त्यात प्रशस्त बेड सोफा बाथरूमची व्यवस्था आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे चालवण्यासाठी सहभागी 36 बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्वसाधारण हाऊस बोटीमध्ये पर्यटकांसाठी खाद्यपदार्थाची रेलचेल असणार आहे. वर्षाकाठी एक ते दीड कोटींची उलाढाल या प्रकल्पातून अपेक्षित आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेद अधिकाऱ्यांनी तसेच सहभागी महिलांनी केरळमधील हाऊस बोट प्रकल्पाची पाहणी केली आहे. मालदोली येथील अग्निपंख महिला प्रभाग संघ हा प्रकल्प राबविणार आहे या प्रभाग संघात 355 स्वयंसहाय्यता समूह, 18 ग्राम संघ तर 3 हजार 847 महिला सहभागी आहेत. सिंधूरत्न योजनेतून हा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. प्रकल्प सुरळीतपणे चालवण्यासाठी या महिलांच्या व्यवस्थापन देखरेख, विपणन लेखा अशा चार समित्या स्थापन केल्या आहेत. वाशिष्टी दाभोळ खाडीत नयन रम्य असा निसर्ग परिसर आहे. पर्यटकांनी हाऊस बोट मधून निसर्गाची पाहणी केल्यास पुन्हा ते सातत्याने इकडे आकर्षित होतील अशी निसर्गाची उजळणी येथे पाहायला मिळते. पर्यटकांसाठी ती एक पर्वणीच ठरेल, असे अध्यक्ष दीपिका कुळे यांनी सांगितले.













