वीज बिल भरले नसल्याचे सांगत माजगाव येथील युवकाला १ लाखाचा ‘ऑनलाईन गंडा ‘

Google search engine
Google search engine

सावंतवाडी पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी : महावितरणचे

विज बिल भरले नसल्याचे सांगून “टीम व्हिवर”च्या सहाय्याने मोबाईल हॅक करून माजगाव येथील प्रवीण साधले यांना तब्बल १ लाख ५ हजाराचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार ३ तारखेला घडला होता. याबाबत त्यांनी येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सावंतवाडी पोलीसांनी दिली.

दरम्यान, अशा प्रकारे ऑनलाईन बिल भरा असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे या भामट्यांपासून सावध राहून फसवणूकीला बळी पडू नये, असे आवाहन सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजगांव येथील साधले नामक हॉटेल व्यावसायिकाने घराच्या कामासाठी पैसे खात्यात ठेवले होते. आठ दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. त्यात तुमच्या दोन महिन्याचे वीज बिल भरलेले नाही. ते त्वरित भरा. अन्यथा तुमचे वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. तसेच त्वरीत बिल भरणा करण्यासाठी ॲप डाऊनलोड करून तुमची माहिती भरा, असे सांगितले. त्यावर या व्यावसायिकाने त्या ॲपवर बँक एटीएमची माहिती भरली. त्यानंतर काही क्षणात त्याच्या बँक खात्यातून सातवेळा ट्रान्झॅक्शन होत एक लाख ५ हजार ७७३ रुपये कट झाले. बँक खात्यातील मोठी रक्कम अन्यत्र वळती झाल्याचे समजताच त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे व संबंधित बँकेत धाव घेत माहिती दिली.

माजगाव साधले यांचे हाॅटेल आहे. त्यांच्या हाॅटेलचे बिल भरले नाही, असे सांगून व्हाट्सअप वर अज्ञात व्यक्तीने त्यांना एक संदेश पाठवला. यावेळी त्यांनी बिलाची खातरजमा केली असता आपण बिल भरले आहे, असे सांगितले. परंतु तुमचे बिल तुम्ही भरले असले तरी ते सिस्टीमला दिसत नाही त्यामुळे ते पुन्हा भरावे लागेल, असे सांगून त्यांनी टीम व्हिवर ॲप त्यांना डाऊनलोड करण्यास सांगितले. यावेळी त्यांच्या सांगण्यानुसार साधले यांनी ॲप डाऊनलोड करून आपला मोबाईल त्या अज्ञात व्यक्तीशी शेअर केला हीच संधी साधून संबंधित अज्ञात चोरट्याने तब्बल एक लाख पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंट मधून काढून घेतले. आपल्या खात्यातून एवढी मोठी रक्कम वजा झाल्याचे लक्षात येतात त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान हा प्रकार ऑनलाइन झाल्यामुळे या विरोधात सावंतवाडी पोलिसांनी तक्रार घेतली असून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अशा प्रकारे गेले काही दिवस वीज कंपनीच्या नावाने मेसेज येत आहेत. यातून अनेकांची फसवणूक झाली आहे. काहीजणांनी लोकलाजेस्तव तक्रार देण्याचे टाळले आहे. तरी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Sindhudurg