खेड(प्रतिनिधी) खेड अग्निशमन केंद्राच्या आवारात नगर परिषदेची सर्वच वाहने उघड्यावरच उभी केली जात होती. या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमक केंद्राच्या आवारात निवाऱ्यासह संरक्षिक भिंत उभारण्यात येणार आहे. यासाठी आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने २९ लाख १२ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजनही झाल्याने लवकरच वाहनांसाठी निवारा उपलब्ध होणार आहे.
येथील नगर परिषदेच्या कचरागाड्या, पाण्याचा टँकर व इतर वाहने अग्निशमन केंद्राच्या आवारासमोरच उभी केली जातात. केवळ अग्निशमन बंबच इमारतीच्या खाली उभा केला जातो. आवारात उघड्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे चोऱ्यांसारखे अनुचितप्रकार घडत होते. याशिवाय ऊन-पावसामुळे वाहनेदेखील नादुरूस्त होत होती. ही बाब आमदार योगेश कदम यांच्या निदर्शनास आल्यानंतर वाहनांसाठी निवारा उभारण्यासाठी निर्णय घेतला.
त्यानुसार आमदार कदम यांनी नगर परिषदेला तसा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. सततच्या पाठपुराव्यानंतर अग्निशमक केंद्राच्या आवारात निवाऱ्यासह संरक्षक भिंत उभारण्यासाठी २९ लाख १२ हजार रूपयांचा निधी उपलब्ध होताच आमदार योगेश कदम यांच्याहस्ते कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. याप्रसंगी तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, युवा शहर अधिकारी सिद्धेश बेडेकर, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग माने, उद्योजक शैलेश कदम, नगरसेवक राजेश बुढाला, मिनार चिखले, भूषण चिखले, ओमकार तोडकरी, दीपक नलावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









