रत्नागिरी ग्राहक पेठेचे प्रदर्शन साई मंगल कार्यालयात सुरू

 

रत्नागिरी : ग्राहक नेहमीच  राजा असतो. त्यामुळे त्यांच्या सूचना, टीप्स ऐकून आपण सुधारणा केली पाहिजे. आपला ब्रॅंड करण्यासाठी या सूचना महत्त्वाच्या असतात. रत्नागिरी ग्राहक पेठेच्या माध्यमातून प्राचीताई शिंदे यांनी रत्नागितील उद्योगिनींना चांगली संधी मिळवून दिली आहे. त्यांच्यामुळे नवनवीन उद्योजिका तयार होत आहेत, असे प्रतिपादन रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्ष अॅड. शाल्मली आंबुलकर यांनी केले. रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे जे. के. फाईल्स येथील साई मंगल कार्यालयात आयोजित बेगमीच्या वस्तू, पदार्थांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या वेळी रत्नागिरी ग्राहक पेठच्या संचालिका प्राची शिंदे यांनी सांगितले, २००५ पासून मी महिला बचत गट, उद्योगिनींची वस्तू विक्री प्रदर्शने आयोजित करत आहे. महिला उद्योगिनी किंवा व्यावसायिक पैसे मिळवतात पण या प्रदर्शनांतून महिलांना मैत्रिणी मिळतात, माणसं जोडली जातात व रत्नागिरी ग्राहक पेठ हे एक मोठे कुटुंब बनले आहे. ज्यामुळे अनेक महिलांनी आता स्वतःचे दुकाने साकारली आहेत.

व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून रत्नागिरी जिल्हा महिला पतंसस्थेच्या सेक्रेटरी सौ. कृतिका सुवरे तसेच संयोजिका शकुंतला झोरे उपस्थित होत्या. फीत कापून उद्घाटन झाल्यावर दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी उद्योगिनी प्रतीक्षा सरगर, संध्या नाईक, राधा भट, स्वाती सोनार, किर्ती मोडक, शुभांगी इंदुलकर आदी उपस्थित होत्या. महिला पतसंस्थेच्या स्थापनेपासून सेक्रेटरीपद अतिशय कार्यक्षम पद्धतीने सांभाळणाऱ्या सौ. कृतिका सुवरे यांच्या कार्याचा गौरव करून या वेळी त्यांनी ग्राहक पेठेतर्फे सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी पत्रकार अनघा निकम आणि पत्रकार, छायाचित्रकार मकरंद पटवर्धन यांचा सत्कार अॅड. आंबुलकर यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रदर्शनात महिला बचत गट व उद्योगिनींनी आंबे, बेगमीचे पदार्थ, विविध मसाले, पीठे, कोकण मेवा, महिलांसाठीची विविध उत्पादने, पर्सेस, सौंदर्य प्रसाधने, साड्या, ड्रेस मटेरियल, गारमेंट्स आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले आहेत. हे प्रदर्शन ५ मेपर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शनात उद्या पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, २ मे रोजी फनी गेम्स, ३ मे रोजी प्रॉपर्टी खरेदी करताना घ्यावयाची दक्षता यावर शबाना वस्ता यांचे मार्गदर्शन, ४ मे रोजी टाकाऊतून टिकाऊ वस्तू प्रशिक्षण सौ. प्रांजल घोसाळे व ५ मे रोजी रवींद्रनगर, कुवारबाव येथील श्री माऊली महिला भजन मंडळाचे भजन आयोजित केले आहे. रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालिका प्राची शिंदे यांनी केले आहे.