कंपनीने उत्पादनही थांबविले ; जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केली मध्यस्थी
सिंधुनगरी | प्रतिनिधी
केळुस येथील आकाश फिश मिल कंपनीच्या प्रदूषणामुळे संतप्त झालेल्या केळुस दशक्रोशी सुरू केलेले बेमुदत उपोषण पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी तात्पुरते मागे घेतले. ही कंपनी बंद झाली पाहिजे असे या ग्रामस्थांचे म्हणणे असून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दूरध्वनीद्वारे थेट या उपोषणकर्त्या ग्रामस्थांचे माजी मुख्यमंत्री भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्याशी संवाद घडवून आणला. रविवारी आपण जिल्ह्यात असून या कंपनीमुळे प्रदूषण होत असेल तर ती कंपनी बंद करु अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
दरम्यान प्रदूषण महामंडळाचा या संदर्भातील तपासणी अहवाल येईपर्यंत या आकाश मिल कंपनीने आपले उत्पादन तोपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिले आहे. मात्र या पत्रानेही ग्रामस्थांचे समाधान झाले नव्हते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांची दखल घेत उपोषण स्थळी भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच प्रदूषण महामंडळाशी संपर्क साधला. ग्रामस्थांच्या आक्रमकतेनंतर भाजप नेते नारायण राणे यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधत या ग्रामस्थांचा त्यांच्याशी संवाद घडवून आणला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनीही ग्रामस्थांच्या या प्रश्नाबाबत उपस्थित राहून प्रशासनाशी संपर्क साधला.
मोबाईल संवादाद्वारे खासदार भाजप नेते नारायण राणे यांनी ग्रामस्थांचा हा प्रश्न समजून घेतला. या आकाश मिल कंपनीमुळे प्रदूषण होत असेल तर ती कंपनी बंद करण्यासाठी ग्रामस्थांसोबत मी असेन व ती कंपनी बंद करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. रविवारी मी सिंधुदुर्गात येतोय. त्यावेळी आपण भेटू व ग्रामस्थांवरील हा अन्याय मार्गी लावू अशी ग्वाही नारायण राणे यांनी दिली. व उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली. त्यानुसार या ग्रामस्थांनी अखेर आपले उपोषण स्थगित केले.
ग्रामस्थांचा विरोध झुगारुन आकाश फिश मिल अॅण्ड फिश ऑईल प्रा. लि. या कंपनीच्या मनमानी कारभाराला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सहकार्य करीत असल्याचा आरोप केळूस दशक्रोशी ग्रामस्थांनी केला असुन या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात आले.
वेंगुर्ला तालुक्यातील केळूस येथील आकाश फिशमिल दुषीत पाणी येथील समुद्रात सोडत असल्याने पर्यावरणाची हानी होत असून प्रदुषण बाढले आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन कराया जागत आहे. दरम्यान या विरोधात ऑगस्ट महिन्यात आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यावेळी कंपनीने त्रुटींची पुर्तता केल्याची खात्री महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ग्रामस्थांसह संयुक्तरीत्या करावी आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करावी असे निर्देश दिले होते. दरम्यान झालेल्या पाहणीत प्रदुषण मंडळाच्या सूचनांचे पालन कंपनीकडून झाले नसल्याची बाब समोर आली. आणि असे असताना १३ सप्टेंबर रोजी प्रदूषण मडळाने पाईप लाईनने समुद्रात पाणी सोडण्यास कंपनीला परवानगी दिली असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांच्या तक्रारीनुसार १३ ऑगस्ट रोजी या कंपनीच्या उत्पादनाला निर्बध घालण्यात आले होते. मात्र १३ सप्टेंबर रोजी पुन्हा कंपनी सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत, यामुळे मच्छिमार, शेतकरी आणि पर्यावरण प्रेमी यांच्यात नाराजी असून सागरी जैवविविधता आणि सागरी परिसंस्था धोक्यात येणार असल्याकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.
पाईपलाईन जोडणीला मच्छिमारांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळांचा हा आदेश रद्द करावा, कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दुषीत पाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा कंपनीनेच पुनर्वापर करावा, कंपनीतील घनकचरा कंपनीच्या बाहेर सोडण्यावर निर्बध लादण्यात यावेत त्यांची कंपनीतच विव्हेवाट लावण्यात याबी दुर्गंधीयुक्त बासावर नियंत्रण करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत,
केळूस, कालती, म्हापण, खवणे, मळई, आंदुर्ले येथील ग्रामस्थ, मच्छिमार, केळूस मच्छिमार सहकारी सोसायटी यांनी एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्धार केला असून यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याची त्यांनी भूमिका घेतली होती