गाबीत समाजाची कंपनी अथवा सहकार संस्था निर्माण केली जाणार ; राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम उपरकर यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गाबीत समाज बांधव व्यवसाय करत आहेत. गाबीत समाज घटकाला अधिक पुढे नेत पर्यटन निवास व्यवस्थेला वेगळा आकार देत देशभरातील पर्यटकांबरोबर विदेशी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतील यादृष्टीने पर्यटन व्यावसायिकांना संघटन पद्धतीने एकत्र आणले जाणार आहे. येत्या काळात गाबीत समाजाची कंपनी किंवा सहकार संस्था निर्माण करण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. अशी माहिती अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.मालवण गाबीत समाज महोत्सव कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी उपरकर बोलत होते. यावेळी गाबीत समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, डॉ. भाई बांदकर, डॉ. शाम चौगुले, विजय हरम, डॉ. मेथर, श्री. राजम, बाबी जोगी आदी उपस्थित होते.
उपरकर म्हणाले, प्रथमच भरविण्यात आलेल्या गाबीत महोत्सवास गाबीत बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महोत्सवाच्या निमित्ताने शासनाच्या विविध योजना, बँकेच्या योजना, जातपडताळणी यासह अन्य विषयांवर तज्ञांच्या माध्यमातून समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर समाजातील उच्च पदस्थ व्यक्तींना तसेच समाजात मोठे योगदान दिलेल्या गाबीत समाज बांधवांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांनाही चांगला प्रतिसाद लाभला. गाबीत समाज बांधवांनी सहकार्य करण्याबरोबरच या महोत्सवात सहभागी होत हा महोत्सव यशस्वी करून दाखविला आहे.
गाबीत समाजातील प्रत्येक घटकाला पुढे नेण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या माध्यमातून येत्या काळात शिबिरांचे आयोजन करत समाज बांधवांना पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून समाज बांधवांचा विकास, त्यांच्या व्यवसायाला वेगळा आकार देण्यासाठी गाबीत समाजाची कंपनी किंवा सहकार संस्थाही निर्माण करण्याचे काम येत्या काळात केले जाणार असल्याचे श्री. उपरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
जातीचा दाखला, किनारपट्टीवरील मच्छीमारांची घरे यांसारख्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. याचबरोबर मासळी वाहतूक करणारे, महिला मच्छिमार, खलाशी म्हणून मासेमारीस जाणारे समाज बांधव यांना कामगारांचा दर्जा देऊन असंघटित कामगारांना संघटित कामगार म्हणून फायदा मिळवून द्यावा यासाठीही लक्ष वेधण्यात आले आहे असेही श्री. उपरकर यांनी सांगितले.