राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी सध्या केवळ माती परिक्षणाचे काम सुरू आहे. मात्र तरीही या प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या असलेल्या शंका व प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि त्याचे निरसन करण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक गावात बैठकीचे आयोजन करून थेट ग्रामस्थांशी संवाद साधला जाईल असा विश्वास जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी रविवारी धोपेश्वर व बारसू गावातील ग्रामस्थांच्या बैठकीत दिला.
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीची सूचना ग्रामस्थांना उशीराने मिळाल्याने अनेकांना या बैठकीला उपस्थित रहाता आले नाही, त्यामुळे प्रशासनाने थेट गावातच येऊन आता बैठक घ्यावी व माहिती द्यावी अशी मागणी यावेळी उपस्थित काही ग्रामस्थांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी सिंग यांनी गावपातळीवर आपण चर्चा करून वेळ व ठिकाण ठरवा 3 मे नंतर आंम्हाला कधीही सांगा आपण आता ज्या गावांमध्ये प्रकल्प प्रस्तावित आहे त्या प्रत्येक गावात बैठकीचे आयोजन करून ग्रामस्थांशी संवाद साधू व त्यांच्या शंकाचे निरसन करू असे सांगितले.
तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांमध्ये असलेल्या शंका व प्रश्नांचे निरसन करण्यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी रविवारी जिल्हाधिकारी यांनी राजापूरात धोपेश्वर व बारसू गावातील ग्रामस्थांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीची सूचना अनेक ग्रामस्थांना उशीरा मिळाल्याने अनेकांना उपस्थित रहाता आले नाही. मात्र जे ग्रामस्थ उपस्थित होते त्यांच्याशी जिल्हाधकारी सिंग यांनी संवाद साधला.
प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक धनजंय कुलकर्णी, एमआडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शितल जाधव, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी आपले प्रश्न मांडले, या प्रकल्पामुळे बागायतींना धोका होईल का? या प्रकल्पाचा स्थानिकांका काय लाभ होणार? रोजगाराची कशा प्रकारे संधी मिळणार, प्रशिक्षण दिले जाणार काय? शैक्षणिक व आरोग्य सेवांचे काय? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर स्थानिकांमध्ये अद्यापही या प्रकल्पाबाबत शंका असून त्याचे निरसन होणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले. तर गावात येऊन प्रशासनाने माहिति द्यावी अशीही मागणी पुढे आली.
यावेळी जिल्हाधिकारी सिंग यांनी सध्या केवळ माती परिक्षणाचे काम सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर प्रकल्पाबाबत पुढील कार्यवाही होणार आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून आपल्या शंकाचे निरसन करण्याचा आंम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी आता धोपेश्वर, बारसू, शिवणेखुर्द, गोवळ व सोलगाव परिरसात स्थानिक ग्रामस्थ निश्चित करतील तेथे बैठकीचे आयोजन केले जाईल व त्यांच्या शंकाचे निरसन केले जाईल. यासाठी आवश्यकता वाटल्यास तज्ञांनाही बोलावण्या येईल. तर ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न व मागण्यांबाबत शासनाकडे अहवाल सादर केला जाईल असेही सिंग यांनी सांगितले. मी एक जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून आपले म्हणने एकून घेऊन आपल्या शंकाचे निरसन करण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले. यापुढे गाव पातळीवर होणाऱ्या बैठकीत रिफायनरी बाबत प्रेझेंटेशन दाखवतानाच कंपनी काय करणार आहे हे सांगतानाच आपल्याला काय अपेक्षित आहे याचीही दखल घेतली जाईल असे सिंग यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना जिल्हा पोलिस अधिक्षक कुलकर्णी यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये पोलीस प्रशासन आपल्या सोबत असल्याचे सांगितले. तर अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी महिलांना पुढे करून आंदोलन करण्यात येत असून महिलांमध्ये काहीसे भितीचे वातावरण आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये असे आवाहन केले. तर राजापूर प्रांताधिकारी वैशाली माने व तहसीलदार शितल जाधव यांनी प्रशासन कधीही समर्थक आणि विरोधक असा भेदभाव करत नाही, तुंम्ही सगळी मंडळी नेहमीच कामाच्या निमित्ताने आमच्या संपर्कात असता हा संपर्क आणि संवाद असाच ठेवा असे आवाहन केले.
या बैठकीला बारसूचे दिपक कदम, प्रभाकर कदम, प्रितम नांदलस्कर, अकबर दादन, धोपेश्वरचे अनंत खंडे, प्रतिभा लिंगायत, प्रकाश पवार, पन्हळेचे रियाज दादन, अल्ताफ दादन, इरफान चौगुले आदींसह ग्रामस्थ व शासकिय अधिकारी, पत्रकार उपस्थित होते.