कर्मचाऱ्यांना आनंद व प्रेरणा मिळावी यासाठीच स्पर्धा-सुभाषराव चव्हाण

चिपळूण नागरी आयोजित शाखांतर्गत प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

चिपळूण | प्रतिनिधी : महाराष्ट्र व कामगार दिनाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. हे वर्ष संस्थेसाठी भाग्याचे आहे. संस्था चांगली काम करीत आहे. या संस्थेमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. या स्पर्धा हा देखील नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. संस्थेने यावर्षी १ हजार २७ कोटी ठेवींचा टप्पा गाठला आहे. हे काम भूषणावह आहे. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान आहे. त्यासाठीच आनंद व प्रेरणा मिळावी, यासाठी या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी चिपळूण नागरी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा अंतर्गत प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता चिपळूण नगर परिषदेच्या पवन तलाव मैदानावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, वाशिष्ठी डेअरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे प्रशांत यादव, संचालिका ऍड. नयना पवार यांनी श्रीफळ वाढवला. तर स्टंप फित संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते सोडून मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी चिपळूण नागरीच्या शाखांतर्गत खेळाडूंनी मैदानाला फेरी मारली.

यावेळी चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन सूर्यकांत खेतले, संचालक अशोकराव कदम, अशोक साबळे, रवींद्र भोसले, राजेश वाजे, सोमा गुडेकर, सत्यवान महामुणकर, वैभव चव्हाण, उदय पवार आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल चिपळूण नागरी पतसंस्थेचे कौतुक केले. सहकारात प्रथमच अशा क्रिकेट स्पर्धा दाखवत असल्याचे आपण पाहत असल्याचे यावेळी नमूद केले. चिपळुनात शासकीय सेवा बजावत असताना अन्य संस्थांमध्ये चिपळूण नागरीचे देखील आस्थेने नाव घेतले जाते, ही बाब कौतुकास्पद आहे.

ही स्पर्धा प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात असून यावर्षी देखील चिपळूण नागरी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

उद्घाटन सामना चिपळूण नागरी च्या संस्थेच्या शाखांतर्गत पूर्व व पश्चिम विभाग संघ यांच्यात झाला

या स्पर्धेत १२ संघ खेळवले जाणार आहेत. यामध्ये चिपळूण नागरीच्या शाखांतर्गत पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग, उत्तर विभाग, , मध्य विभाग, लगान इलेव्हन, डायमंड इलेव्हन, पश्चिम महाराष्ट्र, वाशिष्ठी इलेव्हन, संचालक इलेव्हन, चिपळूण रायझर, पत्रकार इलेव्हन असे संघ असणार आहेत. विजेत्या संघ‌ाला व उपविजेता संघाला आकर्षिक शिल्ड देण्यात येणार आहे. संस्थेच्या नाविन्यपुर्ण उपक्रमास क्रिडा रसिकांनी व संस्थेच्या चाहत्यांनी गेल्या वर्षी प्रमाणे उपस्थित राहुन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन चिपळूण नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत.