डॉग स्कॉडची मदत : रक्ताळलेला दगड जप्त
सावंतवाडी । प्रतिनिधी : ओवळीये येथे डोक्यात दगड घालून शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर आता या खूनप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच खूनासाठी वापरलेला रक्ताळलेला दगडही जप्त करण्यात आला आहे.
या संशयितांची चौकशी सुरू असून जमीनीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे शेत मांगरालगत शेतकर्याचा मृतदेह आढळून आला होता. रात्री शेत मांगरात झोपायला गेलेल्या लवू सावंत यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. सकाळी त्या ठिकाणी गेलेल्या त्यांच्या भावाला त्यांचा मृतदेह आढळला त्यानंतर स्थानिक पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी घटनेचा पंचनामा करीत रक्ताळलेला दगड जप्त केला.
या नंतर या प्रकरणी डॉग स्कॉडलाही पाचारण करण्यात आले. यावेळी श्वानने दिलेल्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु करण्यात आला असून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. दरम्यान, जमिनीच्या वादातून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मृत लवू सावंत हे शेतकरी कुटुंबातील होते. त्यांचे मोठे कुटुंब आहे. त्यांची मोठी शेती आहे. तसेच दुधाळ जनावरेही आहेत. रात्री ते शेतमांगरात झोपायला जात असत. अशाच प्रकारे रविवारी रात्री ते झोपायला गेले. त्यानंतर सोमवारी त्यांचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृत लवू सावंत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.