Commencement of beautification of Rameshwar temple and premises at Vengurle…
पहिल्या टप्प्यात ५० लाखांचा निधी मंजूर : धार्मिक पर्यटनाला मिळणार गती
वेंगुर्ला | प्रतिनिधी : वेंगुर्ला येथील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरणासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने या कार्याचा शुभारंभ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास योजना अंतर्गत श्री रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरण कार्यासाठी रुपये २ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या भागात रुपये ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून या कार्याची सुरुवात सोमवारी करण्यात आली. प्रारंभी श्रीदेव रामेश्वराला श्रीफळ ठेवण्यात आले. त्यानंतर तलावाच्या ठिकाणी श्रीफळ ठेऊन कामाला प्रारंभ केला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दाजी परब, सचिव रविद्र परब, मानकरी सुनिल परब, प्रताप परब, संजय परब तसेच उमेश येरम, सुनिल डुबळे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, अन्य मानकरी व भक्तमंडळी उपस्थित होते.