Prohibition of fishing by mechanized boats from June 1 to July 31, 2023
रत्नागिरी : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी 01 जून ते 31 जुलै 2023 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यांत्रिक नौकांनी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणारे मच्छिमारांवर कडक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी,असे मत्स्यव्यवसाय विभागाने सूचित केले आहे.
पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचालित व यांत्रिक मासेमारी गलबत यांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित गलबत यांना लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैल अंतरापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण /मार्गदर्शक सूचना/आदेश लागू राहतील.राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैल अंतरापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास / केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, (सुधारणा), 2021 च्या कलम 14 अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकाना बंदी आहे.
तरी सर्व मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक सभासद व अन्य संबंधितांनी या सूचनांची नोंद घेवून बंदी कालावधीत यांत्रिकी नौकांद्वारे सागरात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी कार्यालयाकडून सूचित करण्यात आले आहे.











