Total ban on sale of liquor on May 17, 18, 19 in Gram Panchayat election areas
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड, दापोली,खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील १४८ ग्रामपंचायतीमधील २१० रिक्त सदस्य पदे तसेच ८ थेट सरपंच रिक्त पदांच्या निवडणूकीसाठी दि. १८ मे, २०२३ रोजी मतदान व दि. १९ मे, २०२३ रोजी मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे.
ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित ग्रामपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम, १९४९ चे कलम १४२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी / विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती (सीएल-३, एफएल-२, सीएल/एफएल/ टिओडी-३, एफएल-३, एफएल/बीआर-२, टिडी-१ इत्यादी) खालील प्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
दि.17 मे 2023 (मतदानाचा आधीचा दिवस) संबंधित निर्वाचन क्षेत्र, संपूर्ण दिवस बंद
दि.18 मे 2023 (मतदानाचा दिवस) संबंधित निर्वाचन क्षेत्र, संपूर्ण दिवस बंद
दि.19 मे 2023 (मतमोजणीचा दिवस) संबंधित निर्वाचन क्षेत्र, संपूर्ण दिवस बंद
ज्या ग्रामपंचायत निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होईल, तेथे हे आदेश लागू होणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ५४ व ५६ मधील तरतुदींनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.